जरीपटका पोलीस ठाण्यात जोरदार निदर्शने, एकास अटक
समतानगरात नाल्याच्या साफसफाईवरून झालेल्या भांडणात दोन भावांवर लोखंडी रॉडसह तलवारीने हल्ला करण्यात आला. यात एक भाऊ जागीच, तर दुसऱ्या भावाचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान काही तासातच मृत्यू झाला. या घटनेमुळे समतानगर परिसरात तणाव निर्माण झाला होता. मृताच्या नातेवाईकांनी जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत जमून जोरदार निदर्शने केले. पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याने तणाव निवळला. इम्रतलाल परिमल राणा (२१, समतानगर) आणि पूरणलाल राणा, असे या दोन मृत भावांचे नाव आहे.
जरीपटका पोलिसांच्या माहितीनुसार इम्रतलाल राणा आणि पुरणलाल राणा हे आई व बहिणीसह समतानगरात राहत होते. त्यांच्या घराशेजारी आरोपी प्रशांत चमके राहतो. तो कुख्यात गुंड असून अवैध धंदे करतो. गेल्या तीन दिवसांपासून राणा बंधू हे घरासमोरील नाला साफसफाईचे काम करीत होते. मात्र, प्रशांत चमकेचा त्याला विरोध होता. शनिवारी सकाळच्या सुमारास प्रशांत चमकेने राणाच्या बहिणीशी वाद घालून शिवीगाळ केली. सायंकाळी घरी आलेल्या दोन्ही भावांना तिने घडलेला प्रकार सांगितला, त्यामुळे चिडलेले दोघेही प्रशांतच्या घरी गेले व बहिणीशी वाद घातल्याबाबत विचारणा केली. प्रशांतने पुन्हा अरेरावी केल्यामुळे दोन्ही भावांनी प्रशांतला भरचौकात बेदम चोप दिला. परिसरात दबदबा असलेल्या प्रशांतला हा अपमान सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी रात्री मित्र अंकूश तोमस्कर, झनकलाल आणि अण्णा यांच्यासह अन्य आठ-दहा मित्रांना दारू पाजली. दुसऱ्या दिवशी वचपा काढण्यासाठी या भावंडांचा गेम करण्याचे नियोजन केले. योजनेनुसार आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास प्रशांत चमके आणि त्याचे साथीदार राणा बंधूंच्या घरी आले. त्यावेळी इम्रतलाल आणि पुरणलाल घरात होते. अचानक आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढविला.दोघांनाही उपचाराकरिता मेयोत हलवण्यात आले, परंतु येथे पोहोचण्यापूर्वी लहान भाऊ इम्रतलालचा मृत्यू झाला, तर पूरणलालचा मेयोत उपचारादरम्यान काही तासात मृत्यू झाला. ही माहिती समतानगर परिसरात कळल्याने तेथे तणाव निर्माण झाला. राणा बंधुंवर झालेल्या हल्ल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळल्याने त्यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात जोरदार निदर्शने केली. त्यामुले तेथे तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two brothers killed over sewers cleaning dispute
First published on: 13-06-2016 at 03:01 IST