चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील गुडगाव येथे राहणाऱ्या दोघांचा दारू सोडण्याची औषध खाल्ल्याने मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सहयोग सदाशिव जीवतोडे (१९), प्रतीक घनश्याम दडमल (२६) दोघेही रा. गुडगाव, अशी मृतांची नावे आहेत, तर सदाशिव पुंजाराम जीवतोडे (४५) व सोमेश्वर उद्धव वाकडे (३५) यांची प्रकृती चिंताजनक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दारूने व्यसनाधीन झालेले भद्रावती तालुक्यातील गुडगाव येथील चार जण जाम जवळील शेडगाव जि. वर्धा येथे शेळके महाराजांकडे दारू सोडवण्यासाठी २१ मे रोजी गेले होते. महाराजांनी त्यांना औषध दिली. सायंकाळी गावी परतल्यानंतर त्यांनी औषध घेतली. यानंतर चौघांचीही प्रकृती बिघडली. त्यांना लगेच भद्रावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये सहयोग व प्रतीक या दोघांचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा >>> नक्षलवादी ठरवून निरपराध नागरिकांची हत्या; छत्तीसगड चकमकीनंतर नक्षल्यांचा पत्रकातून आरोप

माहिती मिळताच भद्रावतीचे ठाणेदार विपिन इंगळे घटनास्थळी दाखल झाले. दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. ज्या औषधीमुळे दोघांचा जीव गेला, त्याचा तपास केला जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साठम यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा >>> आरोग्यसेवक, ग्रामसेवक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

व्यसनमुक्तीच्या नावाखाली अनेकांनी थाटली दुकानदारी चंद्रपूर, नागपूर, वर्धा तथा भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी हमखास दारू सोडा, अशी जाहिरात करून अनेकांनी दुकानदारी थाटली आहे. व्यसनमुक्तीच्या नावाखाली ही दुकानदारी सर्वत्र सुरू आहे. याला अनेकजण बळी पडत आहेत. शासनाची कुठलीही अधिकृत मान्यता नसताना अशाप्रकारची केंद्रे ठिकठिकाणी सुरू आहेत. या केंद्रातील औषधोपचारातून हमखास दारू सोडवता येईल, असा त्यांचा दावा आहे. मात्र, लोकांचा यात बळी जात असल्याने अशा केंद्रांची तपासणी होणे गरजेचे आहे. शासनाची मान्यता नसलेल्या आणि मानवी जिवाशी खेळणाऱ्या या केंद्रांवर कारवाई करावी आणि व्यसनमुक्तीच्या नावाखाली स्वत:चे खिशे भरणाऱ्या भोंदूंना तत्काळ अटक करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two died two critical after medicines consumed to quit alcohol rsj 74 zws