अकोला : अकोट शहर पोलिसांनी तीन जणांच्या टोळीकडून दोन देशी पिस्तुल व नऊ जिवंत काडतूस जप्त केले आहेत. यातील दोन आरोपींना अकोटमधून, तर टोळी प्रमुखाला पुण्यातून पोलिसांनी अटक केली. यातील प्रमुख आरोपी हा आंतरराष्ट्रीय कुख्यात गुन्हेगारांच्या संपर्कात होता, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी रविवारी दिली.

अकोट शहर पोलिसांनी १६ जानेवारीला दोन देशी पिस्तुल व नऊ जिवंत काडतुस बाळगणारे अजय तुकाराम देठे (२७) आणि प्रफुल्ल विनायक चव्हाण (२५) या दोघांना शहरातून अटक केली. आरोपींकडून दोन पिस्तुल, नऊ जिवंत काडतुस व दुचाकी जप्त करण्यात आली. या प्रकरणी प्रमुख सूत्रधार शुभम लोणकर (२५) असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. शुभम लोणकर हा मूळ अकोटचा रहिवासी असून गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वार्जे येथे वास्तव्यास आहे. तो मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे असल्याची माहिती मिळताच अकोट पोलिसांनी जाऊन शोध घेतला असता आरोपी फरार झाला. त्यानंतर तो पुण्यात परत आल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला शहरातील भालेकर वस्ती येथून अटक केली.

हेही वाचा – सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी पोलीस अधिकारी न्यायालयात, राज्यातील पदोन्नती प्रक्रिया थंडबस्त्यात

हेही वाचा – यवतमाळ : क्रिकेट पिचसाठी आणलेल्या सिमेंट पाईप खाली येऊन बालकाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपासादरम्यान शुभम लोणकर हा आंतरराष्ट्रीय गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली. त्या दोघांच्या संपर्काचे अनेक व्हिडीओ कॉल, फोन रेकोर्डिंग तपासात समोर आले आहेत, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. या प्रकरणी अकोट शहर व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस तपास करीत आहेत.