घरात सर्वजण नोकरीवर असून आपण बेरोजगार आहोत, या तणावातून एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनी शुक्रवारी परिसरात घडली. राहुल रामराव मानकर (२८) असे मृत युवकाचे नाव आहे.
त्याचे वडील रामराव माणिकराव मानकर (५७) हे बँकेत कर्मचारी आहेत, तर आई जिल्हा परिषदेत नोकरीला आहेत. लहान भाऊ सॉफ्टवेअर अभियंता आहे. राहुलचे शिक्षण जेमतेम बी.ए. झाले होते. अनेक वर्षांपासून तो नोकरी शोधतो. मात्र, त्याला नोकरी मिळत नव्हती. घरातील सर्वजण दिवसभर कामावर जायचे. त्यावेळी राहुल आणि त्याची मावशीच घरी असायची. नोकरी मिळत नसल्याने त्याच्यात नैराश्य येत गेले आणि दिवसेंदिवस तो शांत होत गेला.
गेल्या काही महिन्यांपासून तो घरातील लोकांशी कमी बोलायचा व दिवसभर आपल्या खोलीत पडून राहायचा. बुधवारी सकाळी सर्वजण बाहेर गेल्यावर राहुल हा आपल्या खोलीत झोपला होता. सायंकाळी सर्व परतल्यावर त्याच्या मावशीने सर्वाकरिता चहा केला. चहा पिण्यासाठी राहुलला आवाज दिला, परंतु त्याने प्रतिसाद दिला नाही. त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावण्यात आला असता तो आतून बंद होता आणि राहुल उत्तर देत नव्हता. त्यामुळे काळजी वाटली. त्याच्या वडिलांनी ताबडतोब दरवाजा तोडला असता त्याने सिलिंग फॅनला गळफास घेतला होता.
त्याला खाली उतरवून मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. कोतवालीचे पोलीस उपनिरीक्षक पी.एस. डोळे यांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्याने बेरोजगारीच्या तणावातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.