करोना’च्या पार्श्वभूमीवर ‘माफसू’तील (महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ) विद्यार्थ्यांची ऑनलाईन मौखिक परीक्षा घेत पहिल्या तीन वर्षांच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात तात्पुरता प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, स्थिती पूर्वपदावर आल्यावर विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणारच असा स्पष्ट निर्णय घेण्यात आला असून तो राज्यपालांकडे अंतिम परवानगीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘माफसू’मधील अभ्यासक्रम हे भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या निकषांवर आधारित आहे. त्यामुळे परीक्षा प्रणालीत बदलासाठी परिषदेतर्फे सुधारित दिशानिर्देश जारी झाल्याशिवाय पुढील पावले उचलता येणार नाहीत. यासंदर्भात देशभरातील विविध विद्यापीठांनी परिषदेला पत्र लिहिले होते. मात्र दिशानिर्देश जारी झाले नसल्याने प्रशासन व विद्यार्थ्यांंमधील संभ्रम वाढला होता. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाचे सहसचिव उपमन्यू बसू यांनी संबंधित सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार पशुवैद्यकीय विद्यापीठे व महाविद्यालये विद्यार्थ्यांचे ‘ऑनलाईन’ वर्ग घेऊ शकतात. शिवाय विद्यार्थ्यांना विविध विषयांचा ‘ई-डाटाबेस’ उपलब्ध करून देण्यात यावा. सोबतच प्रत्येक वर्गानंतर ‘ऑनलाईन असायनमेंट’ देण्यात यावी. टाळेबंदी आणखी शिथिल झाल्यानंतर प्रात्यक्षिकांचे वर्ग घेण्यात यावे, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. या सूचनांनुसार नुकतीच ‘माफसू’च्या विद्वत परिषदेत परीक्षेसंदर्भात चर्चा करण्यात आली. सभेमध्ये आलेल्या विविध सूचनानंतर विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणे संयुक्तिक नसल्याने  स्थिती पूर्ववत झाल्यावर परीक्षा घ्याव्या, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पहिल्या तीन वर्षांच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन मौखिक परीक्षा घेत त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: University of animal and fisheries sciences exams will also be held abn
First published on: 26-06-2020 at 00:04 IST