नागपूर : अपात्र उमेदवारांच्या नियुक्त्या करणे, विशिष्ट गटाला झुकते माप देणे, अशा उद्योगांमुळे कायम चर्चेत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी पीएच.डी. छळ प्रकरणात सदस्यांचा रोष टाळण्यासाठी कुठलीही चर्चा न होऊ देता अगदी दोनच मिनिटात विधिसभा गुंडाळली. या दडपशाही धोरणाविरोधात आक्रमक झालेल्या सदस्यांनी कुलगुरूंविरोधात घोषणा देत आंदोलन केले. विशेष म्हणजे, कुलगुरूंनी विद्यापीठातील लोकशाही व्यवस्थेची हत्या केली असा आरोप सदस्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी काळात विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणुका होणार आहेत. ही विधिसभेच्या कार्यकाळातील शेवटची बैठक होती. त्यातच पीएच.डी.साठी विद्यार्थिनींचा मानसिक आणि आर्थिक छळ करण्यात आल्याच्या तक्रारीमुळे शैक्षणिक वर्तुळातील वातावरण तापले आहे. विद्यापीठ प्रशासनाला यापूर्वी अनेकदा अडचणीत आणणाऱ्या ‘एमकेसीएल’ या संस्थेला सर्वाचा विरोध असतानाही कुलगुरू डॉ. चौधरी यांनी विद्यापीठात कामाची संधी. या दोन्ही प्रकरणांवरून विधिसभेचे सदस्य सोमवारच्या बैठकीत कुलगुरूंना घेरणार हे निश्चित होते. त्यामुळे कुलगुरूंनी सावध पवित्रा घेत दोन मिनिटात बैठक गुंडाळली, असा आरोप सदस्यांनी केला आहे. कुलगुरूंच्या या दडपशाही धोरणाविरोधात संतप्त सदस्यांनी सुरुवातीला कुलसचिवांना घेराव घालत बैठक घेण्याची मागणी केली. यानंतर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. शतकोत्तर वर्षांकडे वाटचाल करणाऱ्या विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने शैक्षणिक वर्तुळातून कुलगुरूंच्या दडपशाहीचा निषेध होत आहे. कुलगुरूंविरोधातील या आंदोलनात व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे, अ‍ॅड. मनमोहन वाजपेयी, डॉ. नितीन कोंगरे, डॉ. आर.जी. भोयर, प्रवीण उदापुरे, डॉ. अजित जाचक, डॉ. स्मिता वंजारी, डॉ. उर्मिला डबीर, शिवानी दाणी यांच्यासह इतर सदस्य सहभागी झाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: University repression vice chancellors anger legislators meeting ended two minutes ysh
First published on: 22-03-2022 at 01:04 IST