डॉ. वसंतराव देशपांडे संगीत समारोह
जपानच्या ताकाहिरोच्या संतूर वादनातील हळवे सूर आणि त्यातील नजाकत, पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीतून निघालेला स्वराविष्कार आणि त्याला पं. विजय घाटे आणि पं. भवानी शंकर यांची तबला व पखवाजावर मिळालेली संगत आणि ज्येष्ठ कथक नृत्यांगणा शमा भाटे यांच्या शिष्यांनी डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या बंदीशीवर सादर केलेले पदलालित्याने संगीत समारोहाचा दुसऱ्या दिवस रसिकांना आनंद देऊन गेला. सूर आणि ताल आणि नृत्याविष्काराच्या मैफिलीने रसिकांना श्रावण सुरू होण्याच्या आधी सूर तालांची मेजवानी मिळाली.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती समारोहाच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ जपानच्या ताकाहिरो या युवा कलावंताच्या संतूर वादनाने झाला. राग यमनने त्यांनी कार्यक्रमाचा प्रारंभ केल्यानंतर आलाप, जोड आणि त्यानंतर बंदीश सादर केली. काश्मीरचे वाद्य असलेल्या संतूरवरील सूर आणि त्यातील नजाकत रसिकांना अनुभवायला मिळाली. विलंबित आणि त्यानंतर द्रुत तीन तालामध्ये बंदीश सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. ताकाहिरो यांना तेवढीच दमदारपणे साथसंगत चंद्रशेखर गांधी यांनी केली. दोघांच्या सूर आणि तालाच्या जुगलबंदीचा आस्वाद रसिकांनी यावेळी घेतला.
संतूर वादनानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाला प्रारंभ झाला. त्यांनी प्रारंभी भुपाली राग सादर केला. आलाप, जोड आणि झाला सादर केल्यानंतर नऊ मात्रामध्ये भुपाली रागामध्ये बंदीश सादर केली. बऱ्याच वर्षांनंतर पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाचा आनंद रसिकांना मिळणार असल्यामुळे सभागृह खचाखच भरले होते. बासरीचे सूर आणि त्याला आणि विजय घाटे यांची तबला व भवानीशंकर यांची पखवाज संगत मिळाल्याने रसिक मंत्रमुग्ध झाले. बासरी आणि तबल्याची जुगलबंदी रसिकांनी यावेळी अनुभवली. बासरीवादनानंतर शमा भाटे आणि शिष्यांनी वसंतराव देशपांडे यांच्या बंदिशीवर सादर केलेला नृत्याविष्कार रसिकांना आनंद देऊन गेला.
तत्पूर्वी पं. मदन पांडे आणि पं. नारायणराव मंग्रुळकर या ज्येष्ठ संगीतकारांचा खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी खासदार विजय दर्डा, विभागीय आयुक्त अनुपकुमार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे मुख्य न्या. भूषण गवई, केंद्राचे संचालक डॉ. पीयूष कुमार, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले.