‘जम्बो’ योजनांसाठी ग्राहकांच्या रांगा, जुळवाजुळवीत दिवस गेला

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी देशातील ‘बीएस-३’ (भारत स्टेज तीन) या वायू प्रदूषणविषयक मानकाच्या दुचाकी, चारचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घालताच वाहन विक्रेत्यांचे धाबे दणाणले. या निर्णयानंतर १ एप्रिल २०१७ पासून बीएस-३ वाहनांची परिवहन कार्यालयांमध्ये नोंद होणार नसल्याने वाहन विक्रेत्यांनी गुरुवारी मोठय़ा योजना जाहीर करून ग्राहकांना सवलतीच्या दरात विक्री केले. मात्र, सर्व ‘शोरुम’मध्ये साठा संपुष्टात (‘नो स्टॉक’)चे फलक लागले असल्याने अनेकांना वाहन खरेदीवरील ‘जम्बो’ योजनांचा लाभ घेता आला नाही. सवलतीच्या दरात वाहन खरेदीसाठी शहरातील सर्व ‘शोरुम’बाहेर ग्राहकांच्या रांगा दिसून आल्या. मात्र, आज परिवहन कार्यालयांमध्ये नोंदणी करण्याचा अखेरचा दिवस असल्याने ‘शोरुम’धारकांनी केवळ परिवहन कार्यालयातील नोंदणीचे काम केले.

वाढत्या प्रदूषणावर आळा बसण्यासाठी सरकारने वाहनांवरील बीएस-३ बंदीचा प्रलंबित निर्णय अचानक जाहीर केला. त्यामुळे शनिवार, १ एप्रिल २०१७ पासून कोणत्याच प्रकारच्या बीएस-३ वाहन विक्रीवर बंदी येणार असल्याचे कळताच शहरातील अनेक वाहन विक्रेत्यांनी आपल्याकडे असलेल्या वाहनांवर मोठय़ा रकमेची सूट दिली. ग्राहकांनी त्याचा फायदा घेत ‘शोरुम’ गाठले अन् सवलतीचा लाभ घेतला. सर्व ‘शोरुम’मध्ये रात्री उशिरापर्यंत प्रचंड गर्दी होती. दुचाकी वाहनांवर १५ ते २० तसेच चारचाकी वाहनांवर जवळपास १ लाखापर्यंत सूट देण्यात आली. हिरोने १२,५०० रुपये, टीव्हीएसने २०,१५० रुपये तर होंडाने २२ हजार रुपयांपर्यंत सवलती जाहीर केल्या. शुक्रवारी सकाळी ‘शोरुम’ उघडताच ग्राहकांची वाहन खरेदीसाठी सर्व कागदपत्र घेऊन मिळेल ती गाडी विकत घेण्यासाठी चढाओढ दिसून आली. मात्र, शहरातील सर्व ‘शोरुम’मधील वाहन विक्री झाले होते. तसेच शुक्रवार हा नव्याने घेतलेल्या वाहन नोंदणीसाठी अखेरचा दिवस असल्याने ‘शोरुम’धारकांनी ‘शोरुम’चे दरवाजे बंद करून केवळ परिवहन कार्यालयातील नोंदणीचे काम केले. अनेक वाहन विक्रेत्यांनी गुरुवारीच ग्राहकांच्या मागणीनुसार वाहनांची नोंदणी केली, परंतु शुक्रवारी ‘शोरुम’मध्ये वाहन उपलब्ध नसल्याने ग्राहकांनी केलेली नोंदणी रद्द करण्यात आली. तसेच विक्रेत्यांनी जेवढे शक्य होईल तेवढय़ा वाहनांची विक्री करण्याचा प्रयत्न केला. यात शुक्रवारी सर्व ‘शोरुम’मध्ये केवळ ग्राहकांची गर्दी दिसून आली. गुरुवारी नोंदणी केलेल्या ग्राहकांना शुक्रवारी वाहने वितरित करण्यात आले. याचा फायदा ग्राहकांना झाला असला तरी विक्रेता व उत्पादकांना फटका नक्कीच बसला.

सामान्यांना प्रदूषणाचे वावडे

दिल्लीतील प्रदूषणासाठी वाहने मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भारतातील सर्वच शहरात प्रदूषणासाठी वाहने हा घटक मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत असल्याचे समोर आले. त्याच पाश्र्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषण कमी करण्यासाठी म्हणून ‘बीएस-३’ म्हणजेच ‘भारत स्टेज तीन’ इंजिन बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. परिणामी शोरुममधील गाडय़ांच्या विक्रीसाठी विक्रेत्यांनी मोठी सवलत जाहीर केली आणि नागरिकांनी प्रदूषणाच्या दुष्परिणामाचा कोणताही विचार न करता सवलतीच्या दरावर मिळणाऱ्या वाहनाच्या खरेदीकरिता शोरुमकडे धाव घेतली. जागतिक तापमानवाढ, त्यामुळे ढासळलेले पर्यावरण आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम यावर पर्यावरणवादी, पर्यावरण संस्था, न्यायालये ओरडून सांगत असताना, जागतिक पातळीवर त्यावर चर्चासत्र घडून येत असताना नागरिकांनी प्रदूषणाच्या दुष्परिणामाचा विचार न करता प्रदूषण पसरवणाऱ्या वाहनांच्या खरेदीसाठी धाव घेतली.

गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसात वाहनांच्या ‘शोरुम’मध्ये ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मात्र आम्हाला नाईलाजाने गाडय़ांवर मोठी सूट द्यावी लागली अन्यथा आíथक भरुदड आम्हाला बसला असता. दोन दिवसात जवळपास आमच्या ३०० हून अधिक दुचाकी विकल्या गेल्या तर चारचाकी विक्रीलाही चांगला प्रतिसाद होता. सरकारने पर्यायच ठेवला नाही, त्यामुळे सूट देणे भाग होते. ग्राहकांचा भरपूर फायदा झाला. मात्र निर्णय योग्य नव्हता.

ए. के. गांधी, संचालक, ए. के. गांधी मोटर्स

काल दुचाकीवर मोठय़ा प्रमाणात सूट असल्याचे कळताच होंडाच्या अ‍ॅक्टिव्हाची नोंदणी करण्यास गेलो. मात्र, उशीर झाल्याने बराच वेळ कोणी मला महिती देण्यास तयार नव्हता. केवळ काही गाडय़ा शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. गर्दी भरपूर होती. त्यानंतर मी दुसऱ्या ‘शोरुम’मध्ये धाव घेतली. तेथे देखील असे चित्र दिसून आले. अशात शुक्रवारी सकाळी देखील भरपूर प्रयत्न केला, मात्र दुचाकी संपल्याचे फलक ‘शोरुम’बाहेर लावले होते. शेवटी मी गाडी घेण्याचा नाद सोडला.

ध्रुव शर्मा, शांतीनगर