scorecardresearch

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार

करोना प्रतिबंधात्म नियमांचे पालन करण्याची सक्ती सर्वावरच आहे, राजकीय नेत्यांनाही त्यातून सूट नाही, त्यांनी नियम मोडल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे सूतोवाच पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.

(संग्रहित छायाचित्र)

पालकमंत्र्यांचे संकेत

नागपूर : करोना प्रतिबंधात्म नियमांचे पालन करण्याची सक्ती सर्वावरच आहे, राजकीय नेत्यांनाही त्यातून सूट नाही, त्यांनी नियम मोडल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे सूतोवाच पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले. करोनावर मात करण्यासाठी उपाययोजना सूचवाव्या म्हणून पालकमंत्र्यानी मंगळवारी नागपूरच्या प्रमुख दैनिक, वाहिनी तसेच व्यापारी आघाडींच्या प्रतिनिधींशी ऑनलाईन चर्चा केली. नियम फक्त सर्वसामान्यांनाच आहेत का? राजकीय नेते सर्रास उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे, याकडे माध्यम प्रतिनिधींनी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. काही उदाहरणेही दिली. नियम सर्वासाठी सारखेच आहे. नेत्यांनी नियम मोडले तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे राऊत यांनी सूतोवाच केले. शहरातील वाढता मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न करावे, बाजारातील गर्दीवर नियंत्रण आणावे, दंडात्मक कारवाई करावी, संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था करावी, या व तत्सम सूचनाही केल्या. जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन, बेड, चाचण्या, तपासण्या व औषधसाठा योग्य प्रमाणात आहे. कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी प्रशासनाची आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. राजकीय नेत्यांशीही त्यांनी ऑनलाईन संवाद साधला

यामध्ये आमदार आशिष जयस्वाल, कृष्णा खोपडे व अन्य लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तपासणी व लसीकरण वाढविणे आवश्यक असल्याची सूचना राजकीय नेत्यांकडून करण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी विमला आर., पोलीस सहआयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड, माहिती संचालक हेमराज बागुल आरोग्य विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महापौरांना नोटीस

पोलीस आणि महापालिका आयुक्तांनी परवानगी नाकारल्यानंतरही कार्यक्रमाला हजेरी लावणारे महापौर दयाशंकर तिवारी यांना नोटीस बजावण्यात आली आहे, असे सांगतानाच राऊत यांनी नियमभंग करणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन तिवारी यांनी केले होते.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Violators prosecuted indications guardian ysh

ताज्या बातम्या