राजेश्वर ठाकरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्पादन सुरू होण्यापूर्वीच फूर्ड पार्कमध्ये पाच हजारावर अर्ज

नागपूर आणि विदर्भातील युवकांना रोजगार मिळावेत, त्यांना पुणे-मुंबई-नाशिककडे रोजगारासाठी धाव घ्यावी लागू नये म्हणून मिहान-सेझची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या प्रकल्पाला प्रारंभ होऊन आज एक तपाहून अधिक काळ लोटला आहे आणि युवक रोजगार मिळावा म्हणून मिहानमध्ये विविध कंपन्यांचे उबंरठे झिजवत आहेत. पतंजली फूड पार्कमध्ये अद्याप उत्पादनही सुरू झाले नसताना रोजगारच्या आशेने तेथील सुरक्षा चौकीत पाच हजारांहून अधिक युवकांनी नोकरीसाठी ‘बायोडेटा’ जमा केला आहे.

मिहान प्रकल्पात सेझ, नॉन सेझ आणि प्रशासकीय इमारतीमध्ये उद्योजकांना जागा देण्यात आली आहे. सेझमध्ये ६४ उद्योगांनी जमीन घेतली आहे. त्यापैकी केवळ १२ कंपन्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. काही कंपन्यांनी केवळ बांधकाम केले. पंतजली फूड अ‍ॅण्ड हर्बल पार्कमध्ये यंत्र बसवण्याचे काम सुरू आहे. उत्पादन लवकरच सुरू होणार, अशा बातम्या येत असल्याने बेरोजगार युवक नोकरीसाठी तिकडे धाव घेत आहेत. कंपनीच्या सुरक्षा चौकीत बायोडेटा देत आहे. तेथे आतापर्यंत पाच हजाराहून अधिक बायोडेटा जमा झाले आहेत. यापैकी काही युवकांशी प्रस्तुत प्रतिनिधीने संवाद साधला असता बरोजगारीची तीव्रता आणि युवकांमधील निराशेचे दर्शन झाले.

कंपन्यांनी थेट भरती जवळपास बंद केली आहे. या कंपन्या कन्सल्टन्टमार्फत पदे भरतात, ते देखील दोन वर्षांसाठी. या बदल्यात बरोजगार युवकाला पहिल्या महिन्याचे वेतन कन्सल्टन्टला द्यावे लागते. दोन वर्षांनंतर पुन्हा तो बेरोजगार होतो. तुषार मानकर म्हणाला, २०१५ ला यांत्रिकी शाखेत पॉलिटेक्निक झाले. हिंगणा येथील महिंद्रा अँड महिंद्रा येथे काम केले. दहा हजार रुपये प्रतिमहिना वेतन होते. दोन वर्षांचे कंत्राट संपल्यानंतर कामावरून काढून टाकले. मित्राने मिहानमधील कंपन्यामध्ये बायोडेटा देण्याचे सुचवले. पंतजली फूड अँड हर्बल पार्क लवकर सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे म्हणून मी येथे बायोडेटा द्यायला आलो.

याबाबत या फूडपार्कचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, कंपनीने नोकर भरतीसाठी जाहिरात काढली नाही. मात्र, तरुण स्वंयस्फूर्तीने अर्ज देऊन जातात. सुरक्षा रक्षकाला बायोडेटा स्वीकारण्यास सांगितले आहे. कंपनी या युवकांचा नोकर भरतीबाबत विचार करणार का, असे त्यांना विचारले असता त्यांनी ठोस असे काही सांगण्यास नकार दिला.

एकीकडे हा कारखाना मार्च-एप्रिलमध्ये सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे आणि पदभरतीची जाहिरात देखील अद्याप काढलेली नाही, असा विरोधाभास त्यांच्या बोलण्यातून दिसून आला.

परप्रांतातील कामगार

मिहानमधील प्रस्तावित पंतजली फूड अँड हर्बल पार्कमध्ये हरिद्वार येथून एक वरिष्ठ महाव्यवस्थापक आणि १० ते १२ कर्मचारी येथे आणण्यात आले आहे. गोदामे उभारण्यासाठी आणि यंत्र बसवण्यासाठी झारखंडच्या गढवा जिल्ह्य़ातील  कामगार येथे कार्यरत आहेत. या कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडे दररोज १५ ते २० युवक बायोडेटा जमा करीत आहेत. गेल्या वर्षभरात सुमारे पाच हजार युवकांनी बायोडेटा जमा केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wandering in the mihan of youth for employment
First published on: 15-12-2018 at 02:38 IST