अनिल कांबळे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : प्रेमविवाहाला कुटुंबीयांचा विरोध होण्याची भीती असल्यामुळे ‘त्या’ दोघांनी लपून लग्न केले. मात्र, सहा महिन्यांतच पतीला कॅन्सर झाला. पतीचे आयुष्य शेवटच्या टप्प्यावर असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने त्याने पत्नीला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. पतीच्या कुटुंबीयांनी तर त्यांचे लग्नच नाकारले. मात्र, पत्नीने अशाही स्थितीत पतीला साथ देण्याचे ठरवले. अशा बिकट परिस्थितीत भरोसा सेल मदतीला धावले व समुपदेशनाने सुवर्णमध्य साधला.

हेही वाचा >>> Girish Bapat Death : गिरीश बापट यांचे अमरावतीशी नाते

एमबीएचे शिक्षण घेताना रिया आणि प्रशांत (काल्पनिक नाव) यांची ओळख झाली. प्रथम वर्षाला असताना दोघे प्रेमात पडले. कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह करण्याचे ठरवले. न सांगता लग्नही उरकले. प्रशांत एका कंपनीत नोकरीला लागला तर रियासुद्धा खासगी काम करीत होती. दोघांचाही राजा-राणीचा संसार सुरू होता. १४ फेब्रुवारीला ‘व्हँलेंटाईन डे’ असल्यामुळे दोघेही एका हॉटेलमध्ये गेले. प्रेमदिवस साजरा केला. हॉटेलमध्येच रात्री प्रशांतला भोवळ आली. रियाने त्याला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी प्रशांतला चौथ्या पातळीवरील कॅन्सर असल्याचे सांगितले. शेवटचे काही महिने प्रशांतकडे असल्याचेही स्पष्ट केले. रियाने त्याला आधार देत घरी नेले. आजाराबाबत कुटुंबीयांना सांगण्याचा निर्णय प्रशांतने घेतला. त्याने मध्यप्रदेशात राहणाऱ्या आई-वडील आणि बहिणीला कळवले. तेही लगबगीने नागपुरात पोहचले.

हेही वाचा >>> नागपूर: कुनो राष्ट्रीय उद्यानात पाळणा हलला.. नामिबियातून आणलेल्या चित्त्यांनी दिला शावकाला जन्म

परंतु, त्यांना घरात रिया दिसली. कुटुंबीय नाराज झाले. त्यांनी लग्न मान्य नसल्याचे सांगून रियाला हाकलून दिले. मात्र, तिचा जीव माहेरी कासाविस होत होता. ती पुन्हा पतीकडे राहायला आली. ‘तू फक्त २२ वर्षांची आहेस, मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. त्यामुळे तू दुसरे लग्न कर आणि आनंदी आयुष्य जग,’ असा सल्ला पतीने दिला.

…अन् मार्ग सापडला रियासोबतचे लग्न मान्य नसून ती बळजबरी घरात राहत असल्याची तक्रार प्रशांतच्या बहिणीने भरोसा सेलमध्ये केली. पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी रिया-प्रशांतसह दोघांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. प्रेमविवाहावरील चर्चेऐवजी वैद्यकीय उपचाराला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. प्रशांतला अशा स्थितीत पत्नीची भावनिक गरज असल्याचे पटवून दिले. त्यानंतर दोन्ही कुटुंबीय तयार झाले. सध्या पतीच्या सेवेत रिया मग्न असून सासू-सासऱ्यांचेही मन वळवण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wife struggle for cancer husband bharosa cell rushed to help adk 83 zws
First published on: 29-03-2023 at 16:37 IST