मुनगंटीवार यांच्या मदतीमुळे नचिकेत होणार डॉक्टर ; वैद्यकिय शिक्षणासाठी ‘सीएसआर’द्वारे ७.५० लाखांची मदत

सर्वसाधारण, मध्यमवर्गीयांना गुणवत्ता असल्यानंतरही पैशाअभावी वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीचे शिक्षण शक्य होत नाही.

Former Minister Sudhir Mungantiwar
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार( संग्रहित छायचित्र )

चंद्रपूर : सर्वसाधारण, मध्यमवर्गीयांना गुणवत्ता असल्यानंतरही पैशाअभावी वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीचे शिक्षण शक्य होत नाही. मात्र, अशा वेळी एखादी दानशुर व्यक्ती किंवा कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीची मदत मिळाली तर स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा होतो. चंद्रपूरातील नगिनाबाग वॉर्डातील नचिकेत लाखे या विद्यार्थ्याला सीएसआर निधीचे बळ मिळाले असून तो वैद्यकीय शिक्षण घेवून डॉक्टर होणार आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही गोड बातमी नचिकेतला ‘डॉक्टर डे’ च्या दिवशी दिली.

चंद्रपूर शहरातील नगिनाबाग येथील नचिकेत लाखे या विद्यार्थ्याची कौंटुबिक पार्श्वभूमी हलाखीची आहे. अशा परिस्थितीतही त्याने प्रवेश परिक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण करीत वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविला. मात्र, वैद्यकीय शिक्षणासाठी होणारा खर्च अवाक्याबाहेर होता. ही बाब माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात येताच त्यांनी या विद्यार्थ्याला मदतीचा हात दिला. नचिकेतला एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी मुनगंटीवार यांनी ‘सीएसआर’ निधीतुन आवश्यक बाबींसाठी ७.५० लाखांची रक्कम या विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत मिळणार आहे. नचिकेतला वैद्यकिय शिक्षणासाठी मदत मिळवून देत मुनगंटीवार यांनी या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नचिकेतच्या पालकांनी मुनगंटीवार यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे आमदार मुनगंटीवार यांनी यापूर्वीही हजारो विद्यार्थ्यांना अशा प्रकारे प्रवेशासाठी मदत केली आहे. त्यांच्या या मदतीमुळेच नचिकेतचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. डॉक्टर दिनाच्या दिवशीच नचिकेतला ही गोड बातमी मिळाल्याने त्याने मुनगंटीवार यांचे आभार मानत कर्तव्यदक्ष, प्रामाणिक डॉक्टर होण्याचे अभिवचन दिले आहे.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: With the help of mungantiwar nachiket will become a doctor amy

Next Story
उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी- डॉ. अनिल बोंडे
फोटो गॅलरी