संशयित जेरबंद

नाशिक : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करून फरार झालेल्या आणि ११ वर्षांपासून वेश बदलून वेगवेगळ्या ठिकाणी मजुरी करणाऱ्या संशयित पतीला डंबाळवाडी येथून पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. काशिनाथ पवार (बनकर मळा, डंबाळवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

काशिनाथ २०१० मध्ये आडगाव शिवारातील सय्यद पिंप्री रोड भागात वास्तव्यास होता. मोलमजुरी करून उदनिर्वाह करणाऱ्या पवार दाम्पत्यात चारित्र्याच्या संशयातून वाद होत असे. याच संशयातून काशिनाथने लोखंडी फावडे डोक्यात मारून पत्नीचा खून केला.

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र संशयिताचा ठावठिकाणा लागत नव्हता. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी उघडकीस न आलेल्या गुन्ह्यंचा आढावा घेऊन आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, निरीक्षक (गुन्हे) अशोक साखरे यांनी अभिलेखावरील उघडकीस न आलेल्या गुन्ह्यचा तपास सुरू केला.

संशयिताबाबत कुठलाही पुरावा नव्हता. त्याचे छायाचित्र नसल्याने शोध घेणे जिकिरीचे होते. गुन्हे शोध पथकाने प्रारंभी संशयिताचे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचओहळ हे मूळ गाव गाठले. पोलीस शिपाई उत्तम खरपडे यांनी दोन दिवस गावात मुक्काम ठोकून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी संशयित गावात येत नसल्याने मयत झाल्याचा संशय व्यक्त केला. एका ग्रामस्थाने संशयित दिंडोरी येथील बाजारात भेटल्याची आणि दिंडोरी परिसरात शेतात मोलमजुरी करीत असल्याची माहिती दिली. याआधारे पोलिसांनी दिंडोरीत शोध सुरू केला. अनेक ठिकाणी शेतमजुरांचा शोध घेऊनही तो सापडत नव्हता. अखेर डंबाळवाडी येथील बनकर मळ्य़ात तो पोलिसांच्या हाती लागला. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली.

११ वर्षांपासून तो परिसरात वेश बदलून वावरत होता. एका शेतात काही दिवस रोजंदारी काम करून तो दुसऱ्या ठिकाणी जात होता. संशयिताच्या अटकेने खुनाच्या गुन्ह्यची उकल झाली. ही कामगिरी गुन्हे शोध पथकाने निरीक्षक अशोक साखरे यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार, शिपाई विलास चारोस्कर, नितीन जगताप, कुणाल पचलोरे, नारायण गवळी आदींच्या पथकाने केली.