गरोदर, स्तनदा मातांसाठीची ‘अशक्त’ योजना
आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे आदिवासी क्षेत्रात वजनाने कमी असलेली बालके जन्माला येण्याचे प्रमाण अधिक असल्याने या भागातील गरोदर व स्तनदा मातांना एक वेळ सकस आहार देण्याची संकल्पना पुढे आली आहे. त्या अनुषंगाने मांडलेल्या भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा लाभ उत्तर महाराष्ट्रातील ६०५३ अंगणवाडी आणि ४१६ मिनी अंगणवाडीच्या क्षेत्रातील महिलांना देण्यात येणार आहे. बाळाची वाढ होत असताना आईला पोषक आहार मिळणे निकडीचे असले तरी तो अधिकतम २५ रुपयांत देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. महागाईच्या काळात या रकमेत सकस आहार मिळणार कसा, हा प्रश्न आहे.
कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण आदिवासी समाजात ३३.१ टक्के इतके आहे. आदिवासींमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत वजनवाढीचे प्रमाण कमी असल्याने त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येतात, असे अभ्यासावरून अधोरेखित झाले. बालक जन्मानंतर पहिले तीन महिने पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्याने या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले असणे गरजेचे आहे. कमी आहार व गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी याबाबत आदिवासींमध्ये जागरूकता नसल्याने ही स्थिती निर्माण होत आहे. या पाश्र्वभूमीवर, अनुसूचित क्षेत्रातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर व स्तनदा मातांना एक वेळ सकस आहार देण्याची योजना मांडण्यात आली आहे. आदिवासी भागातील अंगणवाडी वा मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर व स्तनदा मातांना आहारातून उष्मांक व प्रथिनांची उपलब्धता करण्यासाठी असा आहार देण्यात येणार आहे.
ही योजना आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली व एकात्मिक बाल विकास योजना यांच्या माध्यमातून राबविण्यात येईल. अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थीना एक डिसेंबरपासून आहार देण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत आणि स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिने एक वेळचा सकस आहार दिला जाईल. राज्यातील १६ जिल्ह्यांत राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी पट्टय़ाला लाभ होणार आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील २९७९, नंदूरबार २४४५, जळगाव ३०१ आणि धुळे जिल्ह्यातील ७४४ अंगणवाडी व मिनी अंगणवाडी परिसरातील महिलांना लाभ मिळणार आहे.
या योजनेसाठी कोणत्या घटकातून किती प्रमाणात कॅलरी, प्रथिने, मेद, कॅल्शियम व लोह मिळू शकेल, याचा अभ्यास करून सकस आहार निश्चित करण्यात आला आहे.
अन्नपदार्थनिहाय त्यांची किंमतही ठरविण्यात आली. त्यावर नजर टाकल्यास महागाईच्या स्थितीत २५ रुपयांत आदिवासी दुर्गम भागात सकस आहार कसा मिळू शकेल, हा प्रश्न आहे.

सकस आहाराचे दरपत्रक
चपाती, भाकरी – सव्वादोन रुपये
तांदूळ – सव्वादोन रुपये
कडधान्ये, डाळ – तीन रुपये
सोया दूध (साखरेसह एक दिवस) व शेंगदाणा लाडू – प्रत्येकी अडीच रुपये
अंडी/ केळी, नाचणी हलवा- पाच रुपये
हिरव्या पालेभाज्या- साडेतीन रुपये
खाद्यतेल – दोन रुपये
मीठ, मसाला, इंधन व इतर खर्च – साडेचार रुपये