सातपूर-अंबड लिंक रस्त्यावरील महिलाही बाधित, निवारागृहातील १२ संशयित रुग्णालयात

नाशिक : शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत असून अंबड-लिंक रस्त्यावरील ६३ वर्षांच्या महिलेचा अहवाल सकारात्मक आल्याने स्थानिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या महिलेचा मुलगा पुण्याहून आलेला होता. त्यामुळे त्यांना संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. उपरोक्त महिलेच्या निवास स्थानाभोवतीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या दिशेने प्रशासनाने पावले टाकली.

दरम्यान, मुंबईहून आलेला जो युवक करोनाबाधित आढळला होता, त्याच्या समाजकल्याण खात्याच्या निवारागृहातील ३१० जणांची वैद्यकीय तपासणी गुरूवारी करण्यात आली. त्याच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या एकूण १२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपरोक्त निवारागृहासह परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करीत र्निजतुकीकरणाचे काम हाती घेतले गेले.

महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या पाचपर्यंत गेली असून अद्याप अनेक रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. दोन दिवसांत शहरात दोन रुग्ण नव्याने वाढले. सातपूर-अंबड लिंक रस्त्यावरील महिला प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल होती. त्यांचे तपासणीसाठी पाठविलेले नमुने सकारात्मक आले. या महिलेने प्रवास केल्याचा इतिहास नाही. तिचा मुलगा करोनाबाधित क्षेत्रातून आल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयातून सांगण्यात आले. याच कारणास्तव तिला संसर्ग झाल्याचा संशय आहे. सातपूर-अंबड लिंक रस्त्यावर संजीवनगर येथे ही महिला वास्तव्यास आहे. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचे काम लगोलग सुरू झाले. तिच्या कुटुंबियांना रुग्णालयात दाखल केले जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुंबईहून आलेल्या नागरिकांमधील एका युवकाला करोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. टाळेबंदीच्या काळात कंटेनर, पायी किंवा अन्य वाहनातून अनेकांनी मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला. त्यातील शेकडो जणांना पोलिसांनी रोखले. संबंधितांची वेगवेगळ्या निवारागृहात निवासाची व्यवस्था करण्यात आली. संबंधित करोनाबाधित युवक नाशिक-पुणे रस्त्यावरील समाजकल्याण विभागाच्या निवारागृहात होता. त्याचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर रात्री त्याच्या संपर्कातील अतिजोखमीच्या आठ जणांना रात्रीत रुग्णालयात दाखल केले गेले. सभोवतालचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करत गुरूवारी वैद्यकीय पथकांनी सर्वेक्षण सुरू केले. या निवारागृहातील इमारतींमधील एकूण ३१० जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये चार जणांना लक्षणे दिसल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण १२ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठण्यिात आले. उपरोक्त क्षेत्रात औषध फवारणीचे काम सुरू आहे. परिसरात सलग १४ दिवस आरोग्य तपासणी सुरू राहणार आहे.

निवारागृहातील ज्या इमारतीत करोनाबाधित रुग्ण आढळला, त्या इमारतीत ११४ जण वास्तव्यास होते. त्यातील बाधित एक आणि अन्य एक पूर्वीच रुग्णालयात दाखल होते. उर्वरित संपर्कातील अतिजोखमीच्या आठ जणांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. उर्वरित १०४ जणांची वैद्यकीय तपासणी करून पुढील निर्णय होईल. इमारतीतील रुग्णासह त्याच्या संपर्कात आलेल्यांच्या दोन खोल्या आणि त्या मजल्यावरील प्रसाधनगृह बंद करण्यात आले आहे.

– सूरज मांढरे जिल्हाधिकारी, नाशिक

जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या ४८ वर

नाशिक : जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या ४८ पर्यंत पोहोचली असून गुरूवारी नाशिक तसेच मालेगाव परिसरात दोन वयोवृध्दांना करोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.

तसेच मालेगाव येथील २६ अहवाल हे नकारात्मक आले आहेत. करोनाची लागण असलेल्या दोन्ही रुग्णांच्या घराजवळील परिसर संपूर्णत बंद करण्यात आला असून या ठिकाणी वैद्यकीय पथकांकडून सव्‍‌र्हेक्षणास सुरूवात करण्यात येईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

शहर परिसरात गोविंद नगर, आनंदवली तसेच जेलरोड परिसरात करोनाचे रुग्ण आढळले.

गुरूवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या ६३ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेला करोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. नाशिक शहरात करोनाबाधित रुग्णांचा आकडा पाच, मालेगाव येथे ४० तर इतर तालुक्यात तीन असे ४८ रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाकडून त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक आणि अन्य मंडळींचे घरीच विलगीकरण करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हा परिसरात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असून सर्वेक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या आशा सेविकांना  नागरिकांकडून सहकार्य दिले जात नाही. त्यांच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलले जात असून काही ठिकाणी त्यांना शिवीगाळही करण्यात आली आहे. करोनाबाधित रुग्णाला दवाखान्यात नेत असतांना वाहनचालकावर थुंकण्याचे काही गैरप्रकार जिल्हा परिसरात घडत आहेत.

यामुळे आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्यात असुरक्षिततेचे वातावरण आहे. याशिवाय उपचार करतांना आवश्यक असणारे पीपीई संच मिळत नसल्याने ते लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांच्या मदतीने मिळवून काम सुरू आहे.