महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत वनपरिक्षेत्र सुरगाणा हद्दीत लोकसहभागातून १ जून ते २५ ऑगस्ट या कालावधीत ५५ हजार चार वृक्षांची लागवड करण्यात आली, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश सातपुते यांनी दिली.

सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सातपुते यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्यासह वन विभागाने राबविलेल्या कृती आराखडय़ाची माहिती दिली.

सार्वजनिक बांधकाम, शिक्षण विभाग तसेच उंबरठाण वनपरिक्षेत्रातील पर्यटनस्थळ तातापाणी परिसरात संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सदस्य रतन चौधरी यांनी स्वत: लोकसहभाग मिळवून साडेतीन हजार रोपांची लागवड केली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचा सहभाग प्रमुख्याने अधिक होता. यामध्ये अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा, अलंगुणचे शहीद भगतसिंग महाविद्यालय, कोठुळाची जिल्हा परिषद शाळा, भोरमाळ, सालभोये, बुबळी, माणी येथील शासकीय आश्रमशाळा आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामस्थ, अधिकारी, विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देऊन जनजागृती केली. यामध्ये वनक्षेत्रातील नियत क्षेत्राधिकारी, वनपरिमंडळ अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, फिरते पथक अधिकारी यांनी सहभाग घेतला.

वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, सातत्याने होणारे हवामानातील बदल याचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध विभाग आणि जनतेच्या सहभागातून ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. जागतिक पातळीवरील तापमान वाढीवर प्रभावी उपाययोजना म्हणजे वृक्षारोपण होय, असे यावेळी सातपुते यांनी नमूद केले.