आजपासून कारवाईचे स्वरूप व्यापक

नाशिक : उच्च न्यायालयाने प्लास्टिकबंदीला स्थगिती देण्याची याचिका फेटाळल्याने शनिवारपासून प्लास्टिकबंदी लागू होत आहे. आतापर्यंत विक्रेत्यांपर्यंत सीमित राहिलेल्या कारवाईच्या फेऱ्यात सर्वसामान्य नागरिक येणार आहेत. बंदीचा निर्णय झाल्यापासून त्याअंतर्गत आतापर्यंत सात लाख रुपयांचा दंड वसूल झाला.

राज्य शासनाने घेतलेल्या प्लास्टिकबंदीच्या निर्णयाबद्दल नागरिकांमध्ये कमालीचा संभ्रम आहे. नेमक्या कोणत्या प्लास्टिक पिशव्या वापरल्या तर चालतील आणि कोणत्या चालणार नाही याबद्दल बहुतांश नागरिक अनभिज्ञ आहेत. अनेकांच्या घरात आधीपासून शिल्लक असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या संकलन केंद्रांवर देण्याची तसदी कोणी फारशी घेतली नाही. यामुळे उपरोक्त निर्णय लागू होत असताना धास्तीचे वातावरण पसरल्याचे दिसून येते.

मुळात शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पालिकेमार्फत काही प्रयत्न करण्यात आले. त्याअंतर्गत नागरिकांसह दुकानदारांचे प्रबोधन, प्लास्टिकमुक्तीसाठी जनजागृतीपर कार्यक्रम, प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करण्यासाठी कठोर अंमलबजावणी सुरू झाली.

प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. या काळात पालिकेमार्फत विक्रेत्यांविरुद्ध नियमितपणे कारवाई सुरू असल्याचे आरोग्य विभागाचे डॉ. सचिन हिरे यांनी सांगितले. विक्रेत्यांविरुद्ध झालेल्या कारवाईतून सात लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या काळात शहरातून जमा झालेले सुमारे सुमारे ३० टनहून अधिक प्लास्टिक पाथर्डीच्या खत प्रकल्पावर नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्लास्टिकबंदी विरोधातील कारवाईसाठी विभागीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत ही कारवाई सुरू असते. नागरिकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर झाल्यास त्यांना दंडात्मक कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे. यासाठी विभागनिहाय पथके कार्यान्वित असून त्यांच्यामार्फत पुढेही ही कारवाई सुरू राहील. प्लास्टिकबंदीचा निर्णय झाल्यानंतर शहरात कापडी पिशव्यांचा वापर वाढत आहे. अनेक दुकानांमधून मालाची खरेदी करताना कापडी पिशव्या दिल्या जातात. कापडी पिशव्यांचा वापर वाढला असला तरी सामान्यांची प्लास्टिक पिशव्यांची सवय तुटलेली नाही. या स्थितीत प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी होत असताना त्याचा कोणाला, कसा फटका बसणार याबद्दल चर्चा सुरू आहे.

कारवाई अशी होणार

*   पहिल्या वेळी पाच हजार रुपये दंड

*  दुसऱ्या वेळी तीच व्यक्ती सापडल्यास १० हजार रुपये

*  तिसऱ्या वेळी २५ हजार रुपये

*  चवथ्यांदा प्लास्टिकचा वापर केल्यास फौजदारी गुन्हा