खासगी दवाखाने बंद असल्याने उपचारात अडचणी

मालेगाव, नाशिक : करोनाचा उद्रेक झाल्यानंतर मालेगाव शहरातील मृत्यू दरात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शासकीय आकडेवारीनुसार करोनामुळे आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांची संख्या १३ असली तरी त्याव्यतिरिक्त अन्य आजार, वृध्दापकाळ यासारख्या कारणांमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या मोठी आहे. शहरातील विविध कब्रस्ताने व महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाच्या नोंदीनुसार एप्रिल महिन्यातील आतापर्यंत झालेल्या मृत्यूची नोंद ७०० पर्यंत पोहोचलेली आहे.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातील मृतांची संख्या २६७ होती. गतवर्षांशी तुलना केल्यास एप्रिल महिन्यातील हा मृत्युदर अडीच पटीपेक्षा अधिक वाढल्याचे दिसते. करोनामुळे शहरातील अनेक खासगी रुग्णालये बंद असल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, हृदयविकार असे अन्य आजार असलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यात बाधा निर्माण झाली आहे. शिवाय करोनाचीमनात भीती निर्माण झाली असल्याने लोक दुखणे अंगावर काढतात. परिणामी आजार बळावत जातो. करोना उद्रेक काळात अन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची हेळसांड होत असल्याने हा मृत्युदर वाढल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. दरम्यान मालेगावसह नाशिक जिल्ह्यात बहुसंख्य खासगी डॉक्टरांनी दवाखाने, रुग्णालये बंद ठेवली आहेत.

मालेगावमध्ये रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. परंतु, खासगी दवाखान्याची सुविधा अपेक्षित प्रमाणात मिळत नाही. सध्याच्या कठीण परिस्थितीत खासगी डॉक्टरांनी दवाखाने उघडे ठेऊन अन्य आजारांवरील उपचार केले तर शासकीय यंत्रणेवरील ताण कमी होईल. करोना नसणाऱ्या रुग्णांवर खासगी डॉक्टरांनी उपचार करावेत. प्रशासनाने मालेगावचे सामान्य रुग्णालय ‘नॉन कोविड’ केले आहे. त्या ठिकाणी नागरिकांना इतर आजारांवरील उपचार मिळू शकतील. नागरिकांनी टाळेबंदीच्या नियमांचे पालन केल्यास करोनाचा प्रार्दुभाव रोखता येईल.

– सूरज मांढरे ,जिल्हाधिकारी, नाशिक