नाशिक-पुणे महामार्गावरील नांदुरशिंगोटे गावाजवळ गुरुवारी रात्री रस्त्यावर उभ्या असणाऱ्या मालमोटारीवर इंडिगो मोटार धडकल्याने झालेल्या अपघातात तिघे ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन बालिकांचा समावेश आहे. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक-पुणे महामार्गाचे सध्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. या स्थितीत वाहनधारक गावातून मार्गक्रमण करताना वेग मर्यादांचे पालन करत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.  रस्त्याच्या बाजूला वाहन उभे न केल्यामुळे आजवर अनेक अपघात घडले आहेत. गुरुवारी रात्री रस्त्यावर उभी असणारी मालमोटार अपघाताचे निमित्त ठरली. संगमनेर येथील बेग कुटुंबीय इंडिको मोटारीने निघाले होते. भरधाव वेगात चालकाला रस्त्यात उभ्या असणाऱ्या मालमोटारीचा अंदाज आला नाही आणि ती तिच्यावर जाऊन धडकली. त्यात अलिया इसाक बेग (२), माविया इसाक बेग (७) आणि सना इसाक बेग (२५, सर्व रा. संगमनेर) यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जण जखमी झाले. अपघाताची माहिती समजल्यानंतर ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.  या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.