भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाची नाराजी

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळास स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी नाव न दिल्याने भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने आयोजकांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी नाशिक असल्याने आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे नाशिक येथील साहित्य संमेलन नगरीस स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी असे नाव देण्याची मागणी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाने साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांकडे केली होती. नाव देण्याबाबतची संपूर्ण भूमिका निवेदनात मांडण्यात आलेली असतानाही संयोजकांनी जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देणे टाळत कुसुमाग्रज नगरी हे नाव दिले, असा आक्षेप भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाने घेतला आहे.

काहीजण बुद्धिभेद करून समूहाचा कुसुमाग्रज यांच्या नावाला विरोध असल्याचे भासवत आहेत वस्तुत: सावरकर, कुसुमाग्रज, कानेटकर, गोविंदाग्रज, रामदास स्वामी या सर्वाचेच कार्य हे असामान्यच आहे. त्यामुळे मराठी माणूस म्हणून असा विरोध असण्याचे काही एक कारण नाही. मात्र ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रत्येक ठिकाणी अन्याय केला जातो, त्यांच्या नावाला विरोध केला जातो, त्या गोष्टी जनतेसमोर येणे आवश्यक असल्याने निषेध नोंदविण्यात आला असल्याचे मनोज कु वर यांनी सांगितले.

यावेळी समूहाचे प्रशांत लोया, मृत्युंजय कापसे, प्रमोद आंबेकर, नीलेश हासे, भुपेश जोशी, श्याम देशमुख, गणेश राठोड, रामदास गाढवे, प्रवीण वाघ, सुनील जोरे, रतन वाघचौरे आदी उपस्थित होते.