चाचण्या थंडावण्याची शक्यता

नाशिक : शहरात करोनाबाधितांची आकडेवारी दिवसागणिक वाढत आहे. महापालिकेने करोनाच्या पार्श्वभूमीवर, ९३ हजार प्रतिजन चाचण्यांचे संच विकत घेऊन तपासणीला सुरुवात केली होती. जळगावमध्ये तुटवडा भासल्याने त्यांना साडेसतरा हजार संच परतीच्या बोलीवर दिले गेले. सद्यस्थितीत महापालिकेकडील प्रतिजन चाचण्यांचे संच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने दोन दिवसात १८ हजार संच उपलब्ध करावेत, अशी मागणी सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी केली आहे. दुसरीकडे प्रशासनाने नव्याने २५ हजार संच खरेदी करण्यासोबत जळगावकडून उर्वरित १५ हजार संच मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू के ला आहे.

शहरात काही दिवसांपासून सरासरी ८०० करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. एकूण रुग्णसंख्या ३१ हजारांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर असून त्यातील २६ हजार ३८ रुग्ण बरे झाले, तर ५३८ रुग्णांचा मृत्यू झाला. सद्य:स्थितीत ४२११ रुग्ण उपचार घेत आहेत. करोनाबाधितांच्या शोधासाठी महापालिकेने शहरात व्यापक प्रमाणात मोहीम राबविली. सामाजिक संस्था, नगरसेवकांच्या सहकार्याने ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन करून संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या जात आहेत. प्रतिजन चाचण्यांसाठी महापालिकेने प्रारंभी ९३ हजार संचांची खरेदी केली होती. प्रशासनाकडून साडेचार हजार संच महापालिकेला मिळाले होते. आतापर्यंत ८२ हजार नागरिकांची चाचणी करण्यात आल्याचे महापालिकेचे आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले. यातील जळगाव महापालिकेला साडेसतरा हजार संच परतीच्या बोलीवर देण्यात आले होते. त्यातील केवळ अडीच हजार संच आतापर्यंत मिळाले असल्याचे नागरगोजे यांनी सांगितले.

महापालिकेकडे सध्या केवळ दीड हजार संच उपलब्ध असल्याची बाब भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमोर मांडली. सरकारने नाशिक महापालिकेला दोन दिवसांत १८ हजार प्रतिजन चाचण्यांचे संच उपलब्ध करावे, अशी मागणी त्यांनी केली. करोनाच्या तपासणीसाठी प्रतिजन चाचणी संचांची मागणी मोठय़ा प्रमाणात आहे. तसेच नव्याने संच उपलब्ध होण्यास विलंब लागणार आहे. यामुळे त्यांची तातडीने उपलब्धता करण्याची मागणी करण्यात आली.

जळगावकडे १५ हजार संच बाकी

नाशिक महानगर पालिके कडून जळगाव महानगरपालिकेला जिल्हाधिकारी आणि आरोग्य उपसंचालक यांच्या विनंतीनुसार मानवीय दृष्टिकोनातून १८००० संच परतीच्या बोलीवर देण्यात आले. यातील अडीच हजार संच मिळाले. उर्वरित संच २० दिवस होऊनही परत देण्यात आले नसल्याची बाब त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. जळगाव महानगरपालिकेला देण्यात आलेले संच महानगरपालिकेला लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे. हे संच वेळेवर उपलब्ध न झाल्यास शहरातील करोनाचा प्रादुर्भाव वाढून मृत्यू दरात वाढ होण्याचा धोका आहे, याकडे टोपे यांचे लक्ष वेधण्यात आल्याचे फरांदे यांनी सांगितले. यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश टोपे यांनी दिले आहेत.