अटी-शर्तीची पूर्तता करण्यास महिलांच्या नाकीनऊ

माता, बाल मृत्यू रोखण्यासाठी सप्टेंबर २०१७ पासून आरोग्य विभागाच्या वतीने पंतप्रधान मातृवंदन योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेस प्रतिसाद लाभत असला तरी अटी-शर्थीची पूर्तता करण्यात लाभार्थी महिलांच्या नाकीनऊ येत हे काम काहीसे संथ सुरू आहे. तुलनेत पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानास प्रतिसाद लाभत असून पेठ, सुरगाणा आणि हरसूल येथे आरोग्य विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

महिला बालकल्याण विभागाच्या वतीने ही योजना सुरू करण्यात आली आहे. जननी शिशु सुरक्षा, जननी सुरक्षा या योजनेच्या लाभार्थी महिला पंतप्रधान मातृवंदन योजनेच्याही लाभार्थी आहेत. अट एवढीच या योजनेत लाभार्थी मातेला पाच हजार रुपयांचा धनादेश मिळेल, पण त्यासाठी तिने गरोदर असल्यापासून बाळ झाल्यानंतर दीड वर्ष सरकारच्या विविध सेवेचा लाभ घ्यायचा. गरोदरपणातील पहिल्या नऊ महिन्यांत मातेसाठी आवश्यक लसीकरण, औषधे तपासण्या करताना तिला टप्प्याटप्प्याने तीन हजार रुपये मिळतील. बाळ झाल्यानंतर ते दीड वर्षांचे झाल्यावर त्याचेही लसीकरण पूर्ण झाले की उर्वरित दोन हजारांचा लाभ होईल. मातेने गरोदरपणात आणि त्यानंतर स्वत:ची योग्य ती काळजी घेत आवश्यक आहार घ्यावा, हाच या मागचा हेतू आहे.

ग्रामीण भागात महिलांना या योजनेची फारशी माहिती नाही. आशा आणि अंगणवाडी सेविकांमार्फत गरोदर मातांची नोंदणी होईपर्यंत तीन ते चार महिन्यांचा कालावधी जातो. नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या एक हजार रुपयांसाठी आवश्यक कागदपत्रे गरोदर मातांकडे नसतात. आधारकार्ड असले तरी ते माहेरच्या आडनावाने असते. काही ठिकाणी वय किंवा नाव, आडनाव अशा काही चुका असतात. नोंदणीच्या सोपस्कारात एक महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर लाभार्थी म्हणून खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात होते. या प्रक्रियेत अडकणाऱ्या महिलांसाठी आरोग्य विभागाने टपाल खात्यात खाते उघडण्याचा पर्याय दिला आहे.

दुसरीकडे, एकाच वेळी विविध खात्यांतून संगणकीय यंत्रणेवर नोंद होत असल्याने कधी सव्‍‌र्हर डाऊन, तर कधी तांत्रिक अडचणींना कार्यालयीन कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागते. आशा, अंगणवाडी सेविकांकडून मिळणारी माहितीही अपुऱ्या स्वरूपात असल्याने ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी येतात.

या सर्व प्रकारामुळे हे काम काहीशा संथपणे सुरू आहे. नाशिक जिल्ह्य़ात १२ हजारांहून अधिक गरोदर मातांनी नोंदणी केली असून सहा हजार महिलांच्या खात्यावर लाभ जमा झाला आहे. दुसरीकडे पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानास ग्रामीण भागात प्रतिसाद लाभत आहे. यातील जोखमीची प्रकरणे ग्रामीण रुग्णालय तसेच मानव विकास कार्यक्रमात पाठविली जात आहे.

सहा हजार प्रकरणांमध्ये त्रुटी

मातृवंदनचे जिल्ह्य़ात १२ हजार लाभार्थी असून त्यातील सहा हजार लाभार्थीच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. उर्वरित सहा हजार लाभार्थीची नावे संगणकात चुकली, तर कुठे आधार कार्ड लिंक झाले नाही अशा त्रुटी आहेत. त्यावर काम सुरू असून लवकरच त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. दुसरीकडे, पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला गरोदर मातांची तपासणी करून त्यातील जोखमीची बाळंतपणे ही मानव विकास किंवा ग्रामीण रुग्णालयात पाठविली जात आहे. जिल्हा रुग्णालयाचा भार कमी करून पेठ-सुरगाणा, हरसूल येथील आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न आहे.    – डॉ. सुशील वाकचौरे (जिल्हा आरोग्य अधिकारी)