13 December 2019

News Flash

सहाशेपेक्षा अधिक मुलांना सुरक्षित बालपण परत

कौटुंबिक, कधी शारीरिक, मानसिक, सामाजिक तर कधी आर्थिक पातळीवर भेडसावणारे प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये कमालीचे नैराश्य आणतात.

(संग्रहित छायाचित्र)

‘नाएसो’तर्फे १० विद्यालयांमध्ये समुपदेशन

कधी कौटुंबिक परिस्थिती, एकल पालकत्व, जवळच्या व्यक्तींकडून होणारे शोषण यामुळे घेतली जाणारी किशोरवयीन मुला-मुलींची धोक्याची वळणे लक्षात घेता नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेच्या १० माध्यमिक विद्यालयांमध्ये समुपदेशनाची व्यवस्था सुरू केली आहे. पाच वर्षांत निवृत्त शिक्षिकांच्या मदतीने ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना सुरक्षित बालपण मिळावे यासाठी संस्थेने प्रयत्न केले आहेत.

संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर, देणगीदार हेमंद्र कोठारी यांनी समुपदेशनाची व्यवस्था आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केली. वर्गातील एखादा खोडकर विद्यार्थ्यांला वठणीवर आणण्यासाठी बऱ्याचदा शिक्षेचा प्रयोग होतो, परंतु त्याला पर्याय देण्यासाठी संस्थेच्या १० निवृत्त ज्येष्ठ शिक्षिकांनी पुढाकार घेतला. यासाठी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडे  प्रशिक्षण घेण्यात आले.

विद्यार्थी वर्गशिक्षक किंवा अन्य विद्यार्थ्यांच्या लक्षात येणार नाही याची काळजी घेत वेगवेगळ्या वर्गावर जात अशा मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न या शिक्षिका करतात. ग्रंथालय, प्रयोगशाळा अशा ठिकाणी गप्पा रंगतात. कौटुंबिक, कधी शारीरिक, मानसिक, सामाजिक तर कधी आर्थिक पातळीवर भेडसावणारे प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये कमालीचे नैराश्य आणतात. यासाठी मोडकळीस आलेली कुटुंब व्यवस्था, भ्रमणध्वनी, वेगवेगळी माध्यमे कारणीभूत ठरल्याचे प्रकल्प समन्वयक सरोजिनी तारापूरकर (सारडा कन्या विद्यालयाच्या शालेय समिती अध्यक्षा) यांनी सांगितले.  उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये पूर्णपणे बदल झाल्याचा दावा करता येणार नसला तरी पालक, मित्र-मैत्रिणींपेक्षा आम्ही त्यांना जास्त जवळचे वाटत आहोत. शाळा सुटल्यानंतरही ही मुले संपर्कात असल्याचे तारापूरकर यांनी सांगितले. प्रामुख्याने कुटुंबातील विसंवादाचा परिणाम मुलांवर जाणवतो. एकल पालकत्वात आईची ससेहोलपट होत असताना मुलगा किंवा मुलगी नाहक भरडले जातात. काही वेळा वडील, भाऊ, काका, मामा यांच्याकडूनच  लैंगिक शोषण होते. धक्कादायक म्हणजे यासाठी काही घटनांमध्ये आईचा पाठिंबा असतो. यामुळे ती मुलगी किंवा मुलगा जास्त बिथरतो, असे निरीक्षण आहे.  अशा बालकांना कायदेशीर मदत मिळवून देण्यात अडचणी येत असल्या तरी आईचे समुपदेशन करण्यावर भर दिला जातो. औद्योगिक वसाहतीत कंपन्यांमधून कामगारांना सहज कामावरून काढले जाते. पण असा पुरुष कामगार आपल्या उदरनिर्वाहासाठी मुलांना शहरातील जवळच्या नातेवाईकाकडे ठेवून दुसरीकडे जातो. तेव्हा त्याच्या पाल्याला संबंधित नातेवाईकांकडून काय वागणूक मिळते, याचा कोठेही विचार होत नाही, याकडे तारापूरकर यांनी लक्ष वेधले.

एकल पालकत्वाच्या अडचणी

तत्कालीन जिल्हा न्यायाधीश नागपूरहून नाशिकला आल्या. काही काळ संपूर्ण कुटुंब एकत्र होते. नंतर मुलगी आणि आई राहू लागले. आई वेळ देत नाही हे पाहून मुलगी शाळेत येईनाशी झाली. केवळ टीव्ही पाहणे, संगणकावर काम करणे आणि सटरफटर खाणे हा तिचा दिनक्रम बनला. यामुळे तिचे वजन वाढले. कमालीचे  नैराश्य आले. समूपदेशन कक्षात आल्यानंतर शाळा, अभ्यास नियमित सुरू झाला.

वडिलांचे प्रेमप्रकरण

आपले वकील असलेले वडील दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडल्याचे जेव्हा १५ वर्षांच्या मुलीला समजले, तेव्हा घरातील वाद आणि वडिलांचे होणारे दुर्लक्ष यामुळे ती चिडचिडी झाली. अभ्यासात ९० टक्के गुण मिळवणाऱ्या मुलीने शाळेत जाणेच बंद केले. शिक्षकांनी तिला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत केली.

First Published on September 5, 2018 3:44 am

Web Title: back to safe childhood with more than 600 children
Just Now!
X