News Flash

तोंडासाठी ‘मास्क’ नाही, हातासाठी मोजे नाहीत

‘बर्ल्ड फ्लू’वेळी शून्यावर आलेला पक्ष्यांचा आकडा २०१२ च्या पशुधन जनसंख्येत कागदोपत्री पाच लाख ७ हजार आहे.

नंदुरबारमधील पोल्ट्री कामगारांची बिकट अवस्था; आरोग्य सुविधांकडे पूर्ण दुर्लक्ष

कुक्कटपालनात अग्रेसर असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यत नवापूर तालुक्यातील पोल्ट्री फार्ममध्ये जवळपास २० लाखहून अधिक पक्ष्यांचे संगोपन केले जाते. हजारो कामगारांच्या मदतीने हे काम होते. असंघटित क्षेत्रातील या कामगार वर्गाला किमान वेतनही हाती पडत नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने पक्षी व कामगारांचा विमा काढणे महत्त्वाचे ठरते. तथापि, विम्यापोटी मोठी रक्कम द्यावी लागत असल्याने हा विषयही बाजूला पडला आहे. उग्र वासात काम करणाऱ्या कामगारांना तोंड झाकण्यासाठी साधे मास्क नाहीत की अंडी हाताळण्यासाठी हातमोजेही मिळत नसल्याचे दिसते. या स्थितीत आरोग्याशी निगडित प्रश्न उद्भवल्यास कामगारांना शासकीय आरोग्य सेवेशिवाय पर्याय नसतो. जी कामगारांची व्यथा तीच लाखो पक्ष्यांचीही. बर्ड फ्लूच्या संकटानंतर वास्तविक व्यावसायिकांनी विमा काढणे आवश्यक होते. परंतु प्रत्यक्षात तसे घडले नसल्याचे नंदुरबारमधील पोल्ट्री फार्मला भेट दिल्यावर लक्षात येते.

सातपुडा पर्वतराजीत वसलेला नंदुरबार हा महाराष्ट्राचा अगदी टोकाचा जिल्हा. मध्य प्रदेश व गुजरातला लागून असणाऱ्या या जिल्ह्यात पोल्ट्री उद्योग चांगलाच बहरलेला आहे. बर्ड फ्लूच्या संकटानंतर सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या या परिसरात मागील दहा वर्षांत पोल्ट्री उद्योगाने अनेक चढ-उतार पाहिले. संकटाच्या चक्रव्यूहातून स्थिरस्थावर असलेले पोल्ट्री व्यावसायिक आजही काम करीत आहेत. एक किंवा दोन फार्म असणारे या व्यवसायातून बाहेर पडले. संकटाची झळ सोसल्यानंतर व्यावसायिकांनी व्यावहारिक दृष्टिकोन अंगिकारत पक्षी संगोपनाची क्षमता वाढविण्यावर भर दिला.

‘बर्ल्ड फ्लू’वेळी शून्यावर आलेला पक्ष्यांचा आकडा २०१२ च्या पशुधन जनसंख्येत कागदोपत्री पाच लाख ७ हजार आहे. सद्य:स्थितीत नंदुरबार जिल्ह्यत २० लाखहून अधिक लेयर प्रजातींच्या कोंबडय़ांचे संगोपन केले जाते. या व्यवसायात आघाडीवर असणाऱ्या एकटय़ा नवापूर तालुक्यात पोल्ट्री फार्मची संख्या २४ असल्याची माहिती पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आसिफ पालावाल यांनी दिली. पोल्ट्री उद्योगात एक हजारहून अधिक कामगार कार्यरत आहेत. त्यात आदिवासी महिलांचे प्रमाणही मोठे आहे. परिसरात उद्योग वा तत्सम पर्याय नसल्याने स्थानिक आदिवासींना रोजगारासाठी हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. प्रामुख्याने अशिक्षित आदिवासी बांधव पोल्ट्री फार्ममधील कामगार वर्ग आहे. त्यात काही ठिकाणी बालकामगारही असल्याचे दिसते.

फार्म परिसरात कोंबडय़ांच्या विष्ठेमुळे उग्र स्वरूपाचा दर्प असतो. कोंबडय़ांची पिसे व विष्ठा याचा वापर शेतात कोंबडी खत म्हणून होतो. त्यामुळे त्याची विल्हेवाट न लावता संचय केला जातो. कोंबडीचे खाद्य बनविणे, अंडे हाताळणे, फार्मची स्वच्छता राखणे, कोंबडय़ांसाठी लागणारे खाद्य तयार करणे, अंडी बाहेरून येणाऱ्या वाहनांमध्ये भरून ठेवणे तत्सम स्वरूपाची कामे कामगाराला दररोज किमान आठ तास करावी लागतात.

यापोटी साधारणपणे १२० ते १५० रुपये रोज मिळतो. हे वेतन प्रत्येक आठवडय़ाला दर शनिवारी संबंधितांना दिले जाते. संपूर्ण महिनाभर काम केले तरी ही रक्कम साधारणत: साडेचार हजार ते पाच हजारांच्या आसपास असते.

शासनाने निश्चित केलेले किमान वेतन ६,५०० रुपये आहे. हे वेतन देताना कामगारांना भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा व तत्सम सुविधा देणे बंधनकारक असते. फार्ममध्ये कार्यरत कामगारांना किमान वेतनही मिळत नसल्याने उर्वरित प्रश्न गौण ठरतात. कोंबडीच्या एखाद्या आजाराचा संसर्ग कामगारांना होऊ नये म्हणून विशेष दक्षता घेणे गरजेचे असते. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगार वर्गाला तोंड झाकण्यासाठी मास्क वा अंडी हाताळणीसाठी हातमोजेही मिळत नसल्याचे दिसून येते. फार्ममध्ये प्रवेश करताना कामगारांना दुसरे कपडे परिधान करावे लागतात. संसर्ग टाळण्यासाठी पादत्राणे बाहेर काढावी लागतात.

‘फंगल इन्फेक्शन’चा त्रास

फार्ममधील कामगार वर्ग असंघटित क्षेत्रात मोडतो. अशिक्षितांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना हक्काची जाणीव नाही. अंडी हाताळताना हातामध्ये प्लास्टिक मोजे तसेच तोंडावर मास्क न ठेवता सोबत आणलेला ओढणी किंवा साडीचा तुकडा ही मंडळी चेहऱ्याला लपेटतात. प्राथमिक सोयी-सुविधांपासून वंचित असणाऱ्या कामगारांना आरोग्याच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता बळावते. पिलांना देण्यात येणारे खाद्य तयार करताना उडणारा धुराळा किंवा शेड्समध्ये सातत्याने जमा होणाऱ्या विष्टेने आरोग्याच्या तक्रारी संभवतात. याशिवाय काही वेळा ‘फंगल इन्फेक्शन’चा त्रास दिसून येत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. गावित हे दहा वर्षांपासून काम करतात. त्यांनी आरोग्याची तक्रार नसली तरी काही वेळा खोकल्याची उबळ येते असे सांगितले. डोळ्यांची नेहमी आग होते. पण काम करताना ते लक्षात येत नाही. नंतर हा त्रास जाणवतो, असे गावित यांनी सांगितले. लहानपणापासून पोल्ट्रीत काम करणाऱ्या संगीता कोकणी यांनी काय त्रास होतो यापेक्षा हे सगळे सरावाचे झाल्याचे सांगितले. वेळच्या वेळी हाती पडणारा पगार महत्त्वाचा आहे. काही त्रास झाला तर सरकारी दवाखाना किंवा डॉक्टरांकडे जाते, असे त्यांनी सांगितले.

(सीएसई मीडिया फेलोशिप अंतर्गत केलेला अभ्यास)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 3:26 am

Web Title: bad condition of poultry workers in nandurbar
Next Stories
1 गर्भपातप्रकरणी डॉक्टरला पोलीस कोठडी
2 कचराकुंडीपासून नोटाबंदीपर्यंत सारे काही..
3 खासगी जागेतील धार्मिक स्थळांनाही कारवाईची नोटीस
Just Now!
X