नाशिकमधील वाहतूक कोंडी, रस्त्यालगतची अतिक्रमणे यावर उपाययोजनांचा अभाव

नाव ठेवायचे असेल तर कशालाही ठेवता येते, परंतु जे चांगलं आहे, त्याला चांगलंच म्हणावे लागेल.. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रकल्पांना दाद देताना दिलेले हे प्रशस्तिपत्रक. गजबजलेल्या मुंबईतील दमट वातावरणातून बाहेर पडून नाशिकला भेट देणाऱ्या कोणालाही सध्याचा गारवा प्रसन्नता देणारा आहे. या वातावरणात संगीतमय कारंजे ‘लेझर शो’चा अंतर्भाव असणारे वन उद्यान, वाहतूक बेट आणि उड्डाणपुलाच्या खालील भागाचे सुशोभीकरण.. असे विलक्षण प्रकल्प पाहिल्यावर कोणीही नाशिकच्या प्रेमात पडेल यात शंका नाही. राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेले प्रकल्प निश्चितच आगळेवेगळे आहेत, मात्र परदेशातील भव्यदिव्य प्रकल्पांशी साधम्र्य साधणाऱ्या या प्रकल्पांमुळे शहरवासीयांचे मूलभूत प्रश्न सुटल्याचे मानता येणार नाही.

महापालिकेतील सत्ताधारी मनसेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. मनसेचा बालेकिल्ला म्हणून नावारूपास आलेल्या नाशिकमध्ये गतवेळी राज यांनी देशातील सुंदर शहर बनविण्यासाठी जे भलेमोठे स्वप्न दाखविले होते. त्यातील काही प्रकल्प प्रत्यक्षात उतरले. मनसेकडून उमेदवारी मिळावी म्हणून तेव्हा इच्छुकांनी लेखी व तोंडी परीक्षा दिली होती. आता निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे २६ नगरसेवक सत्ताधारी सेना-भाजपने पळवून नेले. एकदा हाती सत्ता दिल्यास नाशिकला सुंदर शहर बनविण्याचा संकल्प राज यांनी आधीच सोडला होता. त्या अनुषंगाने पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना मनसेने ‘सीएसआर’ निधीतून अनेक कामे हाती घेतली. त्या अंतर्गत राज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा पाटेकर यांच्यासह अभिनेते भरत जाधव, केदार शिंदे, पुष्कर श्रोत्री यांच्या उपस्थितीत पार पडला. राज्यात असे भव्यदिव्य प्रकल्प कुठेही नसल्याचे सांगून नानांनी राज यांच्या कामाचे कौतुक केले.

अंतर्गत समस्या तशाच

सिंहस्थात चकचकीत झालेले रस्ते, नवीन पूल, मार्गिका फलक, राज यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या प्रकल्पांनी नाशिकचे बाह्य़रूप काहीअंशी बदलले आहे. अंतर्गत रूपात मात्र फरक पडलेला नाही. वाहतूक कोंडी, वाहनतळांअभावी रस्त्यांवर उभी राहणारी वाहने, कचरा संकलन करणारी घंटागाडीची रेंगाळलेली व्यवस्था, मूलभूत गरजांशी निगडित असे अनेक प्रश्न कायम राहिल्याची बहुतेकांची भावना आहे. फलकांनी होणारे विद्रूपीकरण न्यायालयाने आदेश देऊनही थांबलेले नाही. रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्याची मोहीम दीड वर्षांपासून ‘चालूच’ आहे.

मागील २० वर्षांत नाशिकमध्ये जितकी कामे झाली नसतील, तितकी कामे मनसेच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात झाली आहेत. नवीन वर्तुळाकार मार्गिका, प्रमुख मार्ग तसेच अंतर्गत सर्व रस्त्यांच्या नूतनीकरणाची कोटय़वधींची कामे झाली आहेत. आकर्षक वाहतूक बेट आणि लवकरच पूर्ण होणाऱ्या उड्डाणपुलाखालील सुशोभीकरणाने शहराच्या सौंदर्यात भर पडली. ‘लेझर शो’चा अंतर्भाव असणारे वन उद्यान, संगीतमय कारंजे आदी कामे पूर्णत्वास गेली आहेत.

अशोक मुर्तडक (महापौर)