नाशिक : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार तसेच कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीविरोधात भाजपच्या वतीने मंगळवारी जिल्ह्य़ात तालुक्यांच्या ठिकाणी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारक येथे आंदोलन करण्यात आले.

महिन्याभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाआघाडी सरकारचे मंत्री सत्कार सोहळ्यात मग्न आहेत. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळणाऱ्या घटनेने संपूर्ण देश हादरला. अ‍ॅसिड हल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप करून सरकारचा भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला. सत्ता स्थापन करण्याप्रसंगी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. पण या घोषणेचा सरकारला विसर पडला आहे. सरकारने शेतकऱ्यांचे फक्त अल्प मुदतीचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी योजनेत कसलाच उल्लेख नाही. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, वसंत गीते, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, महापौर सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

आंदोलनामुळे वाहतूक कोंडी

भाजपने हुतात्मा स्मारकासमोर आंदोलन केले. या आंदोलनामुळे मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. आंदोलनाला आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या ‘स्टंटबाजी’मुळे रस्त्यावरून रुग्णवाहिका जाण्यासही अडचण निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बैलगाडी आणण्यात आली. या बैलगाडीवर फोटोसेशन झाल्यानंतर ती तशीच माघारी पाठविण्यात आली.