शहरातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असून त्यास पोलीस व गुन्हेगारांची हातमिळवणी कारक ठरल्याचा आरोप करत भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी शिवाजी नगरच्या कार्बन नाका येथे रास्ता रोको करत सत्ताधाऱ्यांना घरचा अहेर दिला. प्रभाग क्रमांक १७ मध्ये मूलभूत स्वरूपाची विकास कामे करण्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामात कुचराई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, चौकाचौकात उभ्या राहणाऱ्या टवाळखोरांविरोधात मोहीम राबवावी, पोलिसांची गस्त सुरू करावी, आदी मागण्यांकडे पाटील यांनी लक्ष वेधले. शहरात खुनाच्या अगणित घटना घडल्या. पोलीस गुन्हेगारांना मदत करत असल्याने नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महिला व मुलींची छेड काढणारे टवाळखोर, हाणामाऱ्या करणारे समाजकंटक यांच्यावर तातडीने करण्याची गरज आहे. शिवाजीनगर येथे पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी आंदोलकांनी केली. महापालिकेने सातपूर परिसरातील विकासकामांकडे दुर्लक्ष केले. वास्तविक, या प्रभागातून पालिकेला सर्वाधिक कर मिळतो. परंतु, नागरी सुविधा देण्यासाठी हात आखडता घेतला जातो. अनेक रस्त्यांचे रुंदीकरण व दुभाजक टाकण्याचे काम रखडले आहे. जेहान सर्कल ते गंगापूर गावापर्यंतची अनधिकृत बांधकामे हटविणे, प्रभाग क्रमांक १७ मधील रस्ते, वीज, पाणीपुरवठा, घंटागाडी व्यवस्थेशी संबंधित प्रश्न, नैसर्गिक नाले पूर्ववत करणे, पालिकेच्या शाळांमध्ये सुविधा देण्याकडे पालिकेने लक्ष देण्याची मागणी आंदोलकांनी केली.