स्थायी समिती सभापतिपदासाठी आज निवडणूक

महानगरपालिकेची आर्थिक तिजोरी मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदाच्या उमेदवारीत ऐनवेळी हिमगौरी आहेर-आडके यांचे नाव निश्चित झाल्याने त्यावरून भाजपमधील या पदासाठी इच्छुक असलेल्या सदस्यांमध्ये अस्वस्थता उफाळून आली आहे. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, शनिवारी होणाऱ्या स्थायी सभापती निवडणुकीत कोणताही दगाफटका टाळण्यासाठी भाजपने पक्षादेश बजावला आहे.

स्थायी सभापतीपदासाठी शनिवारी सकाळी ११ वाजता निवडणूक होणार आहे. स्थायी समितीत भाजपचे नऊ, तर शिवसेनेचे चार, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, अपक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. स्थायीत भाजपचे बहुमत आहे. भाजपच्या सदस्यांमध्ये सात महिलांचा समावेश आहे. महापालिकेच्या इतिहासात या पदावर महिलेला संधी मिळालेली नव्हती. यंदा ही संधी मिळेल या अपेक्षने सर्वच इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली होती.  दिनकर पाटील, उद्धव निमसे, हिमगौरी आडके-आहेर यांच्यासह अन्य महिला सदस्याही सभापतीपदासाठी इच्छुक होत्या. ऐनवेळी वरिष्ठांकडून हिमगौरी आहेर-आडके यांचे नाव निश्चित झाल्यावर इच्छुकांनी संताप व्यक्त केला. काहींनी शहराध्यक्षांना खडेबोल सुनावल्याचे सांगितले जाते.

भाजपच्या वतीने आडके यांचा अर्ज सादर झाल्यानंतर हा वाद मिटेल ही शक्यता फोल ठरली. काही नाराज सदस्यांनी दुसऱ्या दिवशी थेट मुंबई गाठल्याचे सांगितले जाते.

मात्र ते भ्रमणध्वनीवर उपलब्ध झाले नाही. स्थायी सभापतीपदाच्या उमेदवार हिमगौरी आडके यांनी कोणीही सदस्य मुंबईला गेले नसल्याचे सांगितले.

महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपात उमेदवारांनी पदाधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. महापालिकेत एकहाती सत्ता असूनही पक्षात आमदारांसह इतर पदाधिकाऱ्यांचे वेगवेगळे गट आहेत. प्रत्येकाकडून महापालिकेवर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न सुरू असतो. त्याची परिणती या वादात झाल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरू आहे.

स्थायी समितीच्या मतदानात कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून सदस्यांना पक्षादेश बजावण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांमधील अस्वस्थतेचा काही लाभ घेता येईल काय, याची चाचपणी शिवसेनेसह विरोधक करीत आहे. या निवडणुकीसाठी

काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्षांची सेनेने मोट बांधली आहे. भाजपने काही वेगळे राजकारण घडू नये म्हणून आपल्या सदस्यांना अज्ञातस्थळी रवाना केल्याची चर्चा सुरू होती.

शनिवारी थेट मतदानावेळी संबंधितांना पालिकेत आणले जाईल. दरम्यान, शनिवारी भाजपची विभागीय बैठक होणार आहे. या बैठकीला प्रदेश पातळीवरील नेते उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी नाराजांकडून तक्रारीचा पाढा वाचला जाण्याची शक्यता आहे.

प्रत्येकाला टप्प्याटप्प्याने संधी

स्थायी सभापतीपदासाठी उमेदवाराचे नाव वरिष्ठांनी निश्चित केले आहे. शहराध्यक्ष या नात्याने आपल्याला सर्वाना सोबत घेऊन चालायचे आहे. महापालिकेत पाच वर्षांत प्रत्येक नगरसेवकाला महत्त्वाच्या पदांवर किमान एक ते दोन वेळा संधी मिळणार आहे. भाजपमध्ये कोणीही नाराज नाही. टप्प्याटप्प्याने ही पदे मिळतील असे सांगून सर्वाची समजूत काढण्यात आली. पालिकेतील गटनेत्यांमार्फत सदस्यांना पक्षादेश बजावण्यात आला आहे.

–  आ. बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष, भाजप