भाजपचे फुटीर नगरसेवक स्वगृही

नाशिक : राज्यात नव्याने आकारास आलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचा प्रयोग नाशिक महापालिकेत फसला. काँग्रेसने उपमहापौर पदावरील दावा कायम ठेवल्याने महाआघाडीत फूट पडली. समीकरण बिघडल्याचे लक्षात आल्यावर भाजपचे फुटीर नगरसेवक स्वगृही परतले. मनसेने भाजपला सहकार्य केल्याने भाजपला महापालिकेवरील सत्ता सहजपणे राखता आली. महापौरपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी, तर उपमहापौरपदी भिकूबाई बागूल यांची बिनविरोध निवड झाली.

राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेनेने स्पष्ट बहुमतात असणाऱ्या भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी पुढाकार घेतला होता. शिवसेनावासी झालेले माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक १० नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकावले होते. हे नगरसेवक सेनेला जाऊन मिळाले.

मात्र, सत्ता अबाधित राखण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली. मनसेचा पाठिंबा मिळवला. बंडखोरांना स्वगृही आणले. विरोधकांची सर्वच समीकरणे विस्कटल्याने स्थानिक राजकारणात महाआघाडीचा प्रयोग फसला.

 

मनसेचे भाजपला सहकार्य

महापौरपदासाठी भाजपने ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी, तर महाआघाडीच्यावतीने शिवसेनेचे अजय बोरस्ते यांना उमेदवारी दिली होती. सत्तासमीकरण जुळत नसल्याने बोरस्ते यांच्यासह १० जणांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली. उपमहापौरपदासाठी मतदान घेण्याची वेळ आली नाही. नऊ उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका भिकूबाई बागूल यांची बिनविरोध वर्णी लागली. महाआघाडीकडून हे पद भाजपच्या फुटीर गटाचे नगरसेवक कमलेश बोडके यांना दिले जाणार होते. काँग्रेस शेवटपर्यंत पदावर अडून बसली. महाआघाडीच्या बिघाडीला ही बाब मारक ठरली. मनसेने भाजपला सहकार्य करण्याचा मार्ग निवडला. काँग्रेस नगरसेवकांचा आग्रह अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणारा ठरला. मनसेने शिवसेनेला मदत करण्याऐवजी भाजपला मदत केली.

चुरशीची वाटणारी निवडणूक बिनविरोध पार पडली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने हे शक्य झाले. पक्षादेशाचे उल्लंघन केल्यास फुटीर नगरसेवकांवर कारवाई झाली असती. आपण त्यांची समजूत काढल्याने ते स्वगृही परतले. पक्षात जुने-नवीन पदाधिकारी असे कोणतेही वाद नाहीत. महापौरपदी सतीश कुलकर्णी यांच्या माध्यमातून भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांला न्याय देण्यात आला आहे.

– गिरीश महाजन, भाजप नेते आणि माजी पालकमंत्री.