बँकांसमोरील रांगेपासून पदाधिकारी दूर

निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर सलग काही दिवस बँकांमधील गर्दी कायम राहिली. काही दिवसांपूर्वी बँकांबाहेर रांगेत तिष्ठणाऱ्यांना पाणी, बिस्किट व लिमलेटच्या गोळ्यांचे वितरण करत दिलासा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधारी भाजप व शिवसेनेचे जनतेविषयीचे प्रेम अवघ्या काही दिवसांत आटले आहे. दोन ते तीन दिवसांत नागरिकांना बहुतांश बँका वा एटीएमबाहेर तशी काही मदत मिळाल्याचा अनुभव नाही. नागरिकांच्या मदतीला धावून आल्याचे दर्शविण्यामागे राजकीय पदाधिकाऱ्यांचा केवळ प्रसिद्धीचा सोस असल्याची सर्वसामान्यांची भावना झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, भाजप व सेनेची धडपड रांगेतील बहुतांश नागरिकांच्याही आधीच लक्षात आली होती. आता हे पदाधिकारी अंतर्धान पावल्याने राजकीय पक्षांचा कळवळा बेगडी असल्याचे अधोरेखित होत आहे.

[jwplayer 8cIf7m5X]

पंतप्रधानांनी ५०० व एक हजारच्या नोटा चलनातून रद्दबातल ठरविल्यानंतर उडालेला कल्लोळ अद्याप शमलेला नाही. या निर्णयानंतर बँका व एटीएमबाहेर जुने चलन बदलणे, खात्यातून पैसे काढणे व भरणे यासाठी बँकांबाहेर झुंबड उडाली. याच काळात प्रति व्यक्ती ४५०० रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्याची मर्यादा दोन हजार रुपयांपर्यंत कमी केली गेली. नोटा बदलीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या बोटावर शाई लावण्याचे काम सुरू झाले. या बदलांमुळे गोंधळात आणखी भर पडल्याचे चित्र आहे. पैसे बदलविण्यासाठी किती तास उभे रहावे लागेल याची शाश्वती नाही. बँक उघडण्यापूर्वीच अनेक बँकांबाहेर नागरिकांची रांग लागते. या एकंदर स्थितीत त्रस्तावलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी शिवसेना आणि भाजप या राजकीय पक्षांसह काही सामाजिक संघटनाही पुढे सरसावल्या. रांगेत उभ्या राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध नव्हती. खिशात पैसे असले तरी सुटे पैसे मिळत नसल्याने ते खरेदी करणे अवघड झाले. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेने बँकांबाहेर रांगेत उभ्या असणाऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. विविध भागात हा उपक्रम सेनेने राबविला. या व्यतिरिक्त बँकेची पावती, पैसे बदलण्यासाठी भरावयाचा अर्ज भरून देण्याची व्यवस्थाही मदत केंद्रामार्फत करून दिली. रांगेतील ग्राहकांना पाणी, बिस्किट उपलब्ध करून देण्यासाठी सेनेचे पदाधिकारी विविध भागात धडकले होते.

भाजपने या कामासाठी युवा मोर्चाला मैदानात उतरविले. भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी रांगेत उभ्या असणाऱ्या ग्राहकांना पाण्याचे पाऊच व लिमलेटच्या गोळ्यांचे वितरण केले. ठिकठिकाणी हा उपक्रम राबविला गेला. रांगेतील नागरिकांना या निमित्ताने चांगलाच दिलासा मिळाला. या उपक्रमाची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत रीतसर पोहोचविण्याची व्यवस्था राजकीय पक्षांनी केली. काही सामाजिक संस्थांनी याच पद्धतीने काम केले.

तथापि एक-दोन दिवस चाललेला हा उपक्रम राजकीय पक्षांनी नंतर गुंडाळून घेतल्याचे चित्र आहे. ज्या दिवशी हा उपक्रम राबविला गेला, तेव्हा आवर्जून उपस्थित राहणारे पदाधिकारी व त्यांचे कार्यकर्ते आता बहुतांश बँकांबाहेर दिसेनासे झाले. रविवारी हा सुटीचा दिवस असल्याने बँका बंद होत्या. पण, त्याआधीचे दोन दिवस आणि सोमवारीदेखील बहुतांश बँकांमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून झाला नसल्याचे रांगेत उभ्या असणाऱ्या नागरिकांकडून सांगण्यात आले. उलट मागील तीन-चार दिवसांतील अनुभव लक्षात घेऊन बहुतांश नागरिक स्वत: पाण्याची बाटली व तत्सम तयारी करून बँकेत येतात. नोट बदलीची मर्यादा कमी केल्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यामागे आगामी महापालिका निवडणूक हे कारण आहे. एक-दोन दिवस या उपक्रमाद्वारे प्रसिद्धी मिळवत राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते गायब झाल्याचे काही नागरिकांची तक्रार आहे.

[jwplayer zkvFlBpu]