आठ पानटपरीचालक आणि अफवा पसरविणाऱ्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल

नाशिक : राज्यात फैलावणाऱ्या ‘करोना’ मुळे जिल्हा आरोग्य विभाग आणि प्रशासन खबरदारीच्या उपाययोजना करण्यात सक्रिय असतांना संबंधित नियमांचे उल्लंघन शहरातील काही घटकांकडून होत आहे. गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या आदेशाला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात १० लॉन्स चालक तसेच मंगल कार्यालय चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातही अफवा पसरविणाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न होत आहे. जिल्ह्य़ात शुक्रवारी दुपापर्यंत करोना संशयितांची संख्या ४३ पर्यंत गेली आहे. त्यांच्या आवश्यक तपासण्या झाल्या असून ३४ जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. नऊ जणांचे अहवाल मिळणे अद्याप बाकी आहे. सध्या हे नऊ जण जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

आतापर्यंत विदेशातून शहरात आलेल्या २०५ नागरिकांची तपासणी झाली असून १६९ संशयित निरीक्षणाखाली आहेत.

आरोग्य विभाग प्रयत्नशील असतांना पोलीस प्रशासनाकडून कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन करीत लॉन्स, मंगल कार्यालयांना सुचना दिलेल्या असतांनाही त्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर मुंबई नाका, पंचवटी, आडगांव, म्हसरूळ येथील १० लॉन्स चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील काही ठिकाणी पोलीस अधिकारीही विवाह सोहळ्याच्या गर्दीत उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हा परिसरातील आठवडे बाजारावरही करोनाचे सावट असल्याने बाजारपेठा सुनसान असतांना शहरातील मखमलाबाद रस्त्यावरील हनुमान वाडी, आडगाव नाका, ड्रिम कॅस्टल ते चोपडा लॉन्स आदी ठिकाणी विविध सेल लागले आहेत. त्यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी पाहता सहा विक्रेत्यांना नोटीस बजावत कारवाई करण्यात आली आहे.

परिमंडळ दोनमध्ये लॉन्स, मंगल कार्यालय चालक आणि मालकांना नोटीस देण्यात आली आहे. पान टपऱ्या बंद असतांनाही काहींनी त्या सुरू ठेवल्याने आठ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी दिली.

येवल्यात पहिला गुन्हा दाखल

करोनाविषयी जनमानसात असलेल्या भीतीमुळे अफवा पसरवू नये, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. परंतु, येवला येथे एका संशयिताने काही व्यक्तींचे छायाचित्रे करोनाग्रस्त रुग्ण म्हणून समाजमाध्यमांवर टाकले. हा प्रकार लक्षात येताच त्याची खातरजमा करण्यात आली. संबंधित संशयितावर येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, जिल्हा परिसरात लॉन्स, मंगल कार्यालये यांना नोटीसा बजावण्यात येत असून अद्याप गर्दीचा प्रकार आढळला नाही. आढळल्यास मंगल कार्यालय, लॉन्स चालकांसह वधू-वर मंडळीवरही गुन्हा दाखल करण्यात येईल.

– डॉ. आरती सिंह (जिल्हा पोलीस अधिक्षक)

करोनासाठी मदत केंद्र

नाशिक जिल्ह्य़ात करोना आजाराच्या संबंधित प्रतिबंधात्मक उपचारासाठी व आवश्यक माहितीसाठी जिल्ह्य़ात चार माहिती केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. नागरिकांनी या मदत केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

*   जिल्हा रुग्णालय नाशिक ०२५३-२५७२०३८, २५७६१०६, टोल फ्री क्रमांक १०४

*    नाशिक महानगरपालिका – ०२५३-२५९००४९ , टोल फ्री क्रमांक १०४

*   जिल्हा परिषद नाशिक ०२५३-२५०८५१२, टोल फ्री क्रमांक- १०७५

*   मालेगाव महानगरपालिका ०२५५४-२३१८१८, टोल फ्री क्रमांक १०४