उद्योजकांच्या दहशतीने ‘मऔविम’ कार्यालयातील अधिकारी तणावाखाली

सातपूर येथील उद्योग भवन इमारतीत ‘मऔविम’चे प्रादेशिक कार्यालयात गेल्या तीन महिन्यांपासून उद्योजकांच्या अरेरावी आणि दहशतीने धास्तावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी अखेर सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्याची वेळ मंडळावर आली आहे. उद्योजकांच्या छळवणुकीने सध्या अनेक जण बदली करून घेण्याच्या मानसिकतेपर्यंत आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

सातपूर येथील उद्योग भवन इमारतीत ‘मऔविम’चे प्रादेशिक कार्यालय असून जवळपास १९ अधिकारी-कर्मचारी तिथे काम करतात. गेल्या तीन महिन्यांपासून दोन उद्योजकांनी येथील कर्मचाऱ्यांची या ना त्या कारणावरून छळवणूक सुरू केली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा समावेश अधिक असल्याने त्यांना त्याचा अधिक त्रास होत आहे.

कार्यालयात एक-दोन खुच्र्या रिकाम्या दिसताच हे उद्योजक आपल्या भ्रमणध्वनीत त्याचे चित्रण करीत कुठे गेले हे कर्मचारी, अशी तारस्वरात होणारी विचारणा करीत असतात.  कोणी रजेवर असल्यास ते कसे गेले, कोणी परवानगी दिली, संबंधितांना बदलून टाका, अशा अरेरावीची भाषेत कर्मचाऱ्यांची हेटाळणी करीत असतात. इतकेच नव्हे तर, उद्योजकांच्या बळावर औद्योगिक विकास महामंडळ चालते. त्यामुळे महामंडळ तुम्हाला वेतन देऊ शकते. मग, आमच्या तक्रारी व इतर अर्जावर त्वरेने कारवाई का होत नाही.. अशा धमकावणीच्या सूरात होणारी प्रश्नांनी कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

मध्यंतरी एका उद्योजकाच्या तक्रारीवरून भूखंडाची पडताळणी करण्यासाठी पर्यवेक्षक गेले होते. तेव्हा दुसऱ्याने कारखान्यातील महिलांकडे संबंधित पर्यवेक्षकाने वेगळ्या नजरेने पाहिल्याची तक्रार करत धक्का दिला. याच स्वरुपाची वेगळी धमकी दुसऱ्या उद्योजकाने एक फाईलच्या प्रकरणात दिली. या दबावामुळे संबंधित अधिकारी इतका धास्तावला की, त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मध्यंतरी एका उद्योजकाने मऔविमच्या जल वाहिनीतून पाण्याची चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्या प्रकरणात संबंधित विभागाच्या अभियंत्याने उपरोक्त कारखान्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे संबंधित उद्योजकाने अभियंत्यावर पैशांची मागणी केल्याचे आरोप केल्याचे उदाहरण देऊन अधिकाऱ्यांचे तोंड बंद केले आहे. त्यामुले या उद्योजकांविरुद्ध तक्रार करण्यास कोणी धजावत नाही.

महिला कर्मचाऱ्यांची अधिक संख्या लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात करण्याचे निश्चित झाले आहे. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची येण्याची व जाण्याची नोंद केली जाईल. इतकेच नव्हे तर, कार्यालयात घडणाऱ्या घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी लवकरच सीसी टीव्ही कॅमेरा यंत्रणा कार्यान्वित होत असल्याचे संबंधिताकडून सांगण्यात आले.

भूखंड वादात कर्मचारी मेटाकुटीला

सातपूर औद्योगिक वसाहतीतील एक भूखंड मिळविण्यासाठी दोन उद्योजकांमध्ये स्पर्धा लागली आहे. संबंधितांमधील वादातून उभयतांकडून परस्परांविरुध्द तक्रार आणि माहितीच्या अधिकारात माहिती मागण्याची चढाओढ सुरू आहे. माहितीचा अधिकार कायद्यान्वये ३० दिवसात माहिती देणे बंधनकारक आहे. परंतु, संबंधितांना सकाळी दिलेल्या अर्जाची लगेच सायंकाळी माहिती लागते. त्याकरीता कार्यालयात थयथयाट केला जातो. तक्रार अर्जावरील कारवाईबाबत त्याची पुनरावृत्ती होते. आपल्यावर नाहक खोटेनाटे काही आरोप होऊ नयेत, यासाठी प्रत्यकाने मौन बाळगण्याचे धोरण स्वीकारले आहे. अवघे ‘मऔविम’ कार्यालय संबंधितांनी वेठीस धरल्याने समस्त कर्मचारी कमालीच्या तणावाखाली असल्याचे या कर्मचाऱ्याने नमूद केले. तीन महिन्यांत संबंधितांनी इतके अर्ज  केले की, कार्यालयाचा बहुतांश वेळ त्याच्या निराकरणात खर्ची पडतो. नाशिक कार्यालयाच्या अखत्यारीत १५ औद्योगिक वसाहती असून त्यांच्याशी निगडित कामांची जबाबदारी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आहे. सध्याच्या स्थितीचा अप्रत्यक्ष फटका इतर उद्योग व उद्योजकांच्या कामकाजावर होत असल्याकडे त्या कर्मचाऱ्याने लक्ष वेधले.