नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे विविध भागात पक्ष्यांची गणना आणि निरीक्षण

नाशिक : नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे महिनाभरापासून शहरातील विविध भागात पक्ष्यांची गणना करण्यात येत असून त्याचा समारोप चला पक्षी बघू या उपक्रमाव्दारे झाला. गोदापार्क येथे पक्षी निरीक्षण करण्यात आले.महिन्या भरात केलेल्या निरीक्षणात करोना महामारीमुळे सहा महिन्याच्या टाळेबंदीत शहरी भागात पक्ष्यांचा किलबिलाट चांगलाच वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.

सध्या संपूर्ण राज्यात पक्षी सप्ताह साजरा होत आहे. या सप्ताहातंर्गत ठिकठिकाणी पर्यारण तसेच पक्षीप्रेमी संस्था, संघटनांच्या वतीने विविध कार्यक्र म होत आहेत. पक्षी निरीक्षणास त्यामुळे मोठी मदत मिळत आहे. अनेकदा एखादा पक्षी दृष्टीस पडतो. तो इतरांपेक्षा वेगळा असतो. परंतु, त्याचे नाव सर्वसामान्यांना माहीत नसते.

शहरी भागातील बहुतेक नागरिकांना चिमणी, कावळा, पारवा, पोपट इतके च पक्षी दिसतात. त्यामुळे अचानक यापेक्षा वेगळा पक्षी दिसल्यास त्यांचे कु तुहूल जागते. हे सर्व जाणूनच शहरात पक्ष्यांची संख्या, त्यांची घरटय़ांचे स्थान, जलप्रदूषण, नायलॉन मांजा आदींचा अभ्यास यावेळी करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या पक्षी सप्ताहाची त्यात भर पडल्याने पक्षीप्रेमींना आनंद झाला. गंगापूर रोड, गोदापार्क, तपोवन, गंगापूर धरण, जुने नाशिक,पांडवलेणी परिसर आदी ठिकाणी पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या.

शहरात एके काळी चाळी, वाडे मोठय़ा प्रमाणावर होते. त्यामुळे अशा ठिकाणी पक्ष्यांना घरटे करण्यास जागा सहज उपलब्ध होत असे. परंतु, आता चाळी, वाडे जावून गगनचुंबी इमारती उभ्या राहू पाहत आहेत, वृक्षांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. यामुळे अनेक पक्षी स्थलांतर करीत असल्याचे देखील निरीक्षण नोंदविण्यात आले. गोदावरी नदीपात्रात पोंड हेरॉन या पक्ष्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात दिसून आली. या पक्ष्यांची संख्या वाढली म्हणजे नदीतील प्रदूषण वाढले असे समजावे. त्याचवेळी नदीपात्रातील स्वच्छ पाण्यात राहणाऱ्या किंगफिशरची संख्या कमी झाल्याचे दिसून आले.

नाईट हेरॉन हा पक्षी अनेक ठिकाणी वृक्षांवर घरटे बनवितांना दिसून आला. रामकुंडाजवळ कावळ्यांनी घरटी बांधली आहेत. अमरधाम पुलाजवळील मोठय़ा दीपमनोऱ्यावर घारीने घरटे के ले आहे. या वर्षी शहरात घारींची संख्या कमालीची वाढल्याचे चित्र बघावयास मिळाले. रुंग्ठा हायस्कूल,अभिनव विद्यामंदिर, सारडा विद्यालयाजवळ  चिमण्यांचा चिवचिवाट वाढल्याचे दिसले. शहरात १५ हजारपेक्षा जास्त कबुतरांची संख्या असावी. जंगलात राहणारे अनेक पक्षी शहरात आल्याचेदेखील दिसले. मलबारी मैनेची संख्या हजारोने शहरात दिसून आली. पक्षी गणना आणि चला पक्षी बघु या  उपक्रमात नेचर क्लबचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, रवींद्र वामनाचार्य, किशोर वडनेरे, डॉ. जयंत फुलकर, सागर बनकर, अपूर्व नेरकर, मेहुल थोरात, हितेश पटेल, दर्शन घुगे, रिद्धी येवला, आकाश जाधव आदी सहभागी झाले होते.