८२ कोटींचा खर्च करण्यास चित्रपट महामंडळ तयार

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या नाशिक जिल्ह्यात दादासाहेब फाळके चित्रपटनगरी उभारण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील मौजे मुंढेगाव येथे ही चित्रपट नगरी उभारण्याचा परिपूर्ण प्रस्ताव मंत्रालयात सादर झाला आहे. तसेच ८२ कोटींचा बांधकाम खर्च करण्यास चित्रपट महामंडळाने मान्यता दिली आहे.

या बाबतची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी ही नाशिकची ओळख. या जिल्ह्यास नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभले असल्याने फाळके यांच्या नावाने चित्रपट नगरी उभारण्यासाठी त्याचा प्राधान्यक्रमाने विचार व्हावा, अशी मागणी गोडसे यांनी मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेऊन केली होती. त्यासाठी इगतपुरीच्या मुंढेगाव येथे ५४.५८ आर जागाही उपलब्ध असल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले. त्या अनुषंगाने परिपूर्ण प्रस्ताव योग्य त्या शिफारशींसह मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. प्रस्तावित चित्रपटनगरीच्या बांधकामाचा खर्च चित्रपट महामंडळ करणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्रही दिले आहे. या पत्रात गोरेगाव चित्रनगरीमुळे महामंडळ सतत नफ्यात चालते. त्यामुळे नाशिक येथे चित्रनगरी उभारणीचा अंदाजित ८२ कोटींचा खर्च टप्प्या टप्प्याने करणे महामंडळास शक्य असल्याचे म्हटले आहे. या चित्रपट नगरीच्या सादर झालेल्या प्रस्तावास लवकरच मान्यता मिळणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले.