हंगामाच्या प्रारंभी तापमान १०.६ अंशावर

नाशिक : एरवी दिवाळी सरल्यानंतर गुलाबी थंडीचे आगमन होणाऱ्या नाशिकमध्ये यंदा तत्पूर्वीच तापमानाने नीचांकी पातळी गाठली आहे. बुधवारी १०.६ अंश या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. नोव्हेंबरच्या १० दिवसांत तापमानात ७.७ अंशाने घट झाली आहे. या महिन्याच्या पूर्वार्धात तापमान इतके घसरण्याची ही मागील काही वर्षांतील पहिलीच वेळ आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१८ मध्ये नोव्हेंबरच्या उत्तरार्धात म्हणजे ३० तारखेला तापमान १०.८ अंश नोंदले गेले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा

थंडीचे महिनाभर आधीच आगमन झाले आहे. सध्या सर्वत्र कमालीचा गारठा पसरल्याने हुडहुडी भरल्याचे चित्र आहे.

थंड हवेसाठी प्रसिध्द असणारे नाशिक हिवाळ्यात अधिकच थंड  होते. दिवाळीनंतर थंडीची चाहूल जाणवू लागते. डिसेंबर, जानेवारीत तापमान नीचांकी पातळी गाठते, या आजवरच्या अनुभवास यंदा छेद मिळाल्याचे दिसत आहे. पावसाळा बराच लांबल्याने ‘ऑक्टोबर हिट’ नेहमीप्रमाणे जाणवली नाही. गुरुवारी वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. त्याआधीच कडाक्याची थंडी दाखल झाल्यामुळे वातावरण विलक्षण बदलले आहे. नोव्हेंबरच्या प्रारंभी तापमान १८.३ अंशापर्यंत होते. पुढील पाच ते सहा दिवसांत ते १२-१३ अंशापर्यंत खाली उतरले. ही स्थिती पुढेही कायम राहिली, बुधवारी पहाटेपासून कमालीच्या गारव्याची अनुभूती मिळाली.

तापमान हळूहळू कमी होते, तेव्हा थंडीचे अस्तित्व लक्षात येते. जेव्हा अकस्मात पालटते, तेव्हा त्याची तीव्रता अधिक जाणवते. या वर्षी हिवाळ्यात काहिशी

तशीच स्थिती निर्माण झाली आहे. सकाळी आणि रात्री हवेत प्रसन्न गारठा जाणवत असून दिवाळीत आल्हाददायक थंडीचा आस्वाद मिळणार आहे. एरवी सुखद अनुभूती देणारी थंडी करोनामुळे धास्ती देखील वाढवत आहे. थंड वातावरणात सर्दी, खोकल्याचे विकार बळावतात. हवामान झपाटय़ाने बदलल्याने अनेकांना त्याची जाणीव होऊ लागली आहे. सध्या शाळा, महाविद्यालये बंद असल्याने सकाळी बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना गारव्याची अनुभूती घरीच घ्यावी लागली. गारठा वाढल्याने रब्बीतील गहू, हरभरा पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. दरवर्षी साधारणत: डिसेंबरमध्ये थंडीची लाट येते. नाताळच्या जवळपास थंडीचा कडाका वाढतो. गेल्या वर्षी थंडीचे आगमन लांबले होते. यंदा मात्र महिनाभर आधीच तीव्र गारव्याची अनुभूती मिळत आहे.

दोन वर्षांतील स्थिती

दिवाळीत काहीसा गारवा जाणवत असला तरी तापमान १० अंशापर्यंतची पातळी सहसा गाठत नाही. यंदाचे वर्ष त्यास अपवाद ठरले. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार २०१९ च्या हंगामात १९ नोव्हेंबरला १३.८ अंश, २८ डिसेंबरला ११.५ आणि जानेवारी २०२० ला सर्वात कमी म्हणजे ६.५ अंश या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्याआधीच्या वर्षांत म्हणजे २०१८ च्या हंगामात नोव्हेंबरच्या पूर्वार्धात तापमान १०.८ अंशापर्यंत खाली आले होते. २९ डिसेंबरला त्या हंगामातील नीचांकी ५.१ अंश तापमानाची नोंद झाली. आठ जानेवारी २०१९ रोजी ६.२ अंश होते. यंदा नोव्हेंबरच्या पूर्वार्धात तापमान १०.६ अंशावर आले आहे.