विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची प्रमुख उपस्थिती
शहरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्था परिस्थितीने नाशिककर हैराण झाले असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी हा विषय प्रामुख्याने मांडण्यास सुरुवात केली असून काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सहा जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
शहर व उपनगरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे बंद करावे यासह इतर मागण्यांसाठी आणि शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व कँाग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, कँाग्रेस अल्पसंख्याक विभागाचे हनिफ बशीर शेख हेही करणार आहेत. गुन्हेगारीविरुद्ध आवाज उठविण्यासाठी निदर्शने करण्यात येणार आहेत. शहरात सर्वत्र गुन्हेगार आणि गुन्हे वाढले आहेत. शहरात नित्य टवाळखोर वाढून महिलांची छेडछाड करण्याचे प्रमाण वाढले आहे. खून, दरोडे, लुटमार यामुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत. पोलिसांच्या लेखी तडीपार असलेले गुंड शहरातच वास्तव्य करत असून अनेक खुनांमध्ये तसेच हाणामाऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग उघड झाला आहे. त्यामुळे तडीपारीला काहीही अर्थ उरलेला नसून गुंडांना पोलिसांनी कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे. दिवसाढवळ्या लुटमार होत असल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांकडून विशेष कारवाई करण्यात येत नसल्याने सर्वच जण नाराज आहेत. या सर्व प्रकारांवर अंकुश राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने उपाययोजना करून ‘सुरक्षित नाशिक’ ही संकल्पना राबवावी यासाठी हे जन आंदोलन उभारण्यात आल्याची माहिती हनिफ बशीर शेख यांनी दिली आहे. द्वारका परिसरातील कथडा येथील शेख यांच्या संपर्क कार्यालयापासून मोर्चा निघणार आहे. मोर्चात कँाग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नाशिककरांनी सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कांदाप्रश्नी आज निफाडमध्ये रास्ता रोको
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे सहा जून रोजी नाशिक दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा तसेच कार्यकर्ता मेळावा होणार आहे. निफाडमध्ये कांदाप्रश्नी रास्ता रोको आंदोलनही करण्यात येणार आहे. प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसची जबाबदारी विखे यांच्याकडे सोपवली आहे. महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कार्यकर्त्यांना संघटित करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच वाढती महागाई, मंत्र्यांचा भ्रष्टाचार याविषयी मेळाव्यात मार्गदर्शन केले जाणार आहे. मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर यांनी केले आहे.