निश्चलनीकरणाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या काँग्रेसने छेडलेल्या आंदोलनाचा दुसरा टप्पा सोमवारी पार पडला. नाशिक शहर काँग्रेस सेवादल आणि महिला आघाडीच्या वतीने अनुक्रमे घंटानाद व थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

नोटाबंदी विरोधात काँग्रेसने देशव्यापी आंदोलन हाती घेतले आहे. पंतप्रधानांनी हा निर्णय ज्या उद्देशाने घेतला, त्यातील एकही उद्देश सफल झाला नसल्याची टीका करत काँग्रेसने वेगवेगळ्या टप्प्यांत आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे.   प्रारंभी शहर सेवा दलतर्फे पक्ष कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन झाले. शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हा अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी मंत्री शोभा बच्छाव आदी सहभागी झाले होते. काँग्रेस महिला आघाडीने अध्यक्षा चारुशीला टोकस यांच्या नेतृत्वाखाली शालिमार चौक येथे थाळीनाद आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने  पक्ष कार्यालयासमोर आंदोलन करावे लागले आहे.   नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशिराने सुरू झालेले आंदोलन अवघ्या १० मिनिटांत आटोपले. महिलांनी  महात्मा गांधी रस्त्यावर  मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावरच रिंगण करत थाळीनाद सुरू ठेवला. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.   तो दूर करण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यां महिला शहराध्यक्षा वत्सला खैरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

आंदोलनामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. आंदोलकांना घेऊन कुठे जायचे यावरून भद्रकाली व सरकारवाडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांमध्ये वाद झाले.