इगतपुरी, त्र्यंबकेश्वर वगळता इतरत्र पावसाचे प्रमाण कमी

नाशिक : राज्यातील काही भागात मुसळधार कोसळत असताना जिल्ह्यात रिमझिम स्वरुपात राहिलेला पाऊस प्रथमच संततधार वळणावर पोहचला आहे. शहर, परिसरात बुधवारी दिवसभर रिपरिप सुरू होती. धरण क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र आहे. संततधार असला तरी पाऊस अद्यापही दमदार नसल्याने धरणांमधील जलसाठय़ात कोणताही विशेष फरक पडलेला नाही. इगतपुरी तालुक्याचा अपवाद वगळता अन्यत्र पावसाचे प्रमाण कमीच आहे.

हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार सकाळी आठ वाजेपर्यंत शहर परिसरात १३.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभर रिपरिप सुरू होती. पावसाचा जोर नसला तरी संततधारेमुळे यंदाच्या पावसाळ्यात शहरात प्रथमच मोठय़ा प्रमाणावर छत्र्या बाहेर पडल्या. काही भागात नेहमीप्रमाणे वीज पुरवठा खंडित झाला. पावसाने वातावरणात गारवा पसरला आहे. या हंगामात अनेक भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाशिक शहरासमोर टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. गंगापूर धरणात पुरेसा जलसाठा नसल्याने आठवडय़ातून एक दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. चालू आठवडय़ात गुरूवारी तर पुढील आठवडय़ापासून दर बुधवारी शहरात पाणी पुरवठा केला जाणार नाही.

पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार मागील २४ तासात दारणा धरण क्षेत्रात ३५ मिलीमीटर, वाकी ५२, भाम ३४, भावली ११९, वालदेवी पाच, गंगापूर ५०, कश्यपी २७, गौतमी-गोदावरी ३२, कडवा १६, आळंदी १७, करंजवण १८, वाघाड २९, पुणेगाव १५, तिसगाव एक, पालखेड दोन मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. तसेच नाशिक तालुक्यात १०, घोटी ७२, इगतपुरी ९५, त्र्यंबकेश्वर ३६, अंबोली ७४ मिलीमीटर पाऊस कोसळला. या वर्षी नाशिक, दिंडोरी, कळवण, देवळा, येवला आणि सिन्नर या सहा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा भागात त्याचा जोर आहे. पावसाअभावी अनेक भागात पेरण्याही रखडल्या आहेत.

जलसाठा जेमतेम ३२ टक्क्यांच्या दिशेने

जिल्ह्यातील लहान-मोठय़ा २३ धरणांमध्ये सध्या १४ हजार १७३ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. मागील वर्षी हेच प्रमाण १६ हजार ३९८ दशलक्ष घनफूट होते. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत जलसाठा दोन हजारहून अधिक दशलक्ष घनफूटने कमी आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये २०९४ दशलक्ष घनफूट, कश्यपी ३७१, गौतमी गोदावरी ३१७, दारणा ४३२६, मुकणे १७९७, वाकी १३८, भाम ५७३, भावली १०५९, वालदेवी ७५१, कडवा २३२, आळंदी ५५, भोजापूर ५०, पालखेड १९३, करंजवण ३८५, ओझरखेड ५४४, वाघाड १०७, तिसगाव तीन, पुणेगाव  ४१, नांदूरमध्यमेश्वर २५७, चणकापूर ३२१, हरणबारी ४५८, केळझर १०१ दशलक्ष घनफूट असा जलसाठा आहे. आठ दिवसांत जिल्ह्यातील एकूण जलसाठय़ात चार टक्क्यांहून अधिकची भर पडली. एरवी काही दिवसांच्या मुसळधार पावसात धरणे तुडूंब होऊन वाहतात. यंदा जुलैच्या उत्तरार्धात जलसाठा कसाबसा ३२ टक्क्यांची पातळी गाठण्याच्या मार्गावर आहे. शहर आणि परिसरात बुधवारी संततधार सुरु होती. त्यामुळे पादचाऱ्याना छत्र्यांचा आधार घ्यावा लागला.