दुकानदार, विक्रेत्यांची करोना चाचणी होणार; ३० पथकांची नियुक्ती

नाशिक : दररोज अनेकांशी संपर्कात येणारे शहरातील किराणा दुकानदार, फळ, भाजीपाला आणि औषध विक्रेते, हातगाडीवरील विक्रेते, केशकर्तनालयातील कारागीर आदी घटकांपासून करोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने संबंधितांची आरटीपीआर तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरीता ३० पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगारांच्या तपासण्या आधीच सुरू करण्यात आल्या आहेत. करोनाचे जलद प्रसारक (सुपर स्प्रेडर) होऊ शकणाऱ्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांत शहरात करोनाचा आलेख झपाट्याने उंचावला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आठ दिवसांवर आला. करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विविध उपाय योजले जात आहे. त्या अंतर्गत शहरातील छोटे-मोठे दुकानदार, व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. सध्या शहरात दैनंदिन ८०० ते ९०० नवीन रुग्ण सापडतात. किराणा दुकानदार, फळ, भाजीपाला, औषधे, हातगाडीवरील लहान मोठ्या वस्तुंची विक्री करणारे यांचा दररोज अनेकांशी संपर्क येतो. या संपर्कामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व विक्रेत्यांची करोना निदानासाठी आरटीपीआर तपासणी करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

त्या अनुषंगाने मनपा आरोग्य विभागाने ३० पथकांची नेमणूक केली. त्यांच्यामार्फत ठिकठिकाणी जाऊन नमुने संकलित केले जातील. संबंधित विक्रेते, व्यापारी, व्यावसायिकांनी पथकास सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

पालिका कर्मचाऱ्यांचीही तपासणी

महानगरपालिकेची सर्व कार्यालये, विभागीय कार्यालये आणि रुग्णालयात कार्यरत असलेले कर्मचारी, शहरातील सर्व सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक आदींचा सतत बाहेरील नागरिकांशी संपर्क येतो. यातील कुणी अधिकारी-कर्मचारी करोनाबाधित झाल्यास ते करोनाचे जलद प्रसारक होऊ शकतात. त्यांच्या संपर्कामुळे देखील करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. हे  लक्षात घेऊन महापालिकेतील विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची देखील आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.