बाधितांचा गृहविलगीकरणाकडे अधिक कल; रुग्णालयांतील निम्म्याहून अधिक खाटा रिक्त

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : पहिल्या दोन ते तीन महिन्यांत करोनाचा अहवाल सकारात्मक आला की, रुग्ण लगेच महापालिका किंवा खासगी रुग्णालयात दाखल होत असत. करोनाविषयी इतकी भीती होती, की डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार व्हावेत, असेच प्रत्येकाला वाटायचे. या धास्तीमुळे करोनाचा कहर सुरू असताना गंभीर रुग्णांना रुग्णालयात खाटा मिळणे जिकिरीचे ठरले होते. कालांतराने भीती कमी होऊ लागली. लक्षणे नसणारे, सौम्य लक्षणे असणारे घरीच उपचार घेऊ लागले. सध्या करोनाबाधितांचा आकडा साडेतीन हजारवर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यातील निम्मे रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. यामुळे महापालिका, खासगी रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या वाढत आहे. आजाराबद्दलची भीती कमी झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीअंशी कमी झाला आहे.

एप्रिलच्या प्रारंभी शहरात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. सुरुवातीच्या काळात प्रतिबंधित क्षेत्राची व्याप्ती मोठी होती. प्रतिबंधित क्षेत्रात रहिवाशांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध होता. करोनाच्या धास्तीमुळे गरज नसताना नागरिकदेखील बाहेर पडत नव्हते. नंतर मात्र प्रादुर्भाव जसा वाढत गेला, तसे नियमदेखील बदलले. शहरातील बहुतांश भाग करोनाच्या सावटाखाली आले. झोपडपट्टी तसेच दाट लोकवस्तीतून करेानाने नंतर इमारती, बंगले अशा कॉलनी परिसरात ठिय्या दिला. दररोज एक ते दीड हजार नवीन रुग्ण आढळत होते. या काळात प्रतिबंधित क्षेत्राचा आकार कमी झाला. र्निबध शिथिलीकरणाच्या दिशेने पावले टाकली गेली. ही प्रकिया टप्प्याटप्प्याने प्रगतिपथावर असली तरी संसर्गाचा धोका आजही टळलेला नाही. त्यामुळे करोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन सर्वच स्तरांतून केले जात आहे. प्रारंभी नागरिकांमध्ये असणारी भीती आणि आजचे चित्र यामध्ये कमालीचे अंतर पडलेआहे. बाजारपेठांमध्ये उसळणारी गर्दी हे त्याचे एक उदाहरण.

शहरात आतापर्यंत करोनाचे ५८ हजार १७८ रुग्ण आढळले. यातील ५३ हजार ८०२ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ८२३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ३५५३ रुग्ण उपचार घेत आहेत. मागील दोन, तीन महिन्यांत उंचावणारा आलेख सध्या काहीसा कमी होत आहे. या काळात करोनाबाधितांच्या मानसिकतेत लक्षणीय बदल झाल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिक्षक बापूसाहेब नागरगोजे यांचे निरीक्षण आहे. आधी प्रत्येक रुग्ण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आग्रही होता. लक्षणे नसणारे, सौम्य लक्षणे असणारे रुग्णालय किं वा काळजी केंद्रात १४ दिवस दाखल व्हायचे. परिणामी महापालिका, खासगी रुग्णालयात बहुतांश खाटा रुग्णांनी व्यापलेल्या होत्या. गंभीर रुग्णांना खाट मिळण्यासाठी धावपळ करावी लागायची. करोनाबद्दल वाटणारी भीती हळूहळू कमी झाली. एकूण रुग्णांमध्ये ८० टक्के रुग्ण लक्षणे नसणारे वा सौम्य लक्षणे असणारे आहेत. त्यांना गृहविलगीकरणाची परवानगी मिळाली. तेव्हा अनेक रुग्ण चार, पाच दिवस रुग्णालयात उपचार घेऊन नंतर घरी विलगीकरणावर भर देऊ लागले. पुढील काळात चाचणी सकारात्मक आल्यानंतर गृहविलगीकरणास प्राधान्य देण्यात आले. घरात विलगीकरणाची सुविधा असल्यास औषधे घेऊन पूर्णपणे बरे होता येते, ही भावना दृढ झाल्याकडे डॉ. नागरगोजे यांनी लक्ष वेधले. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी निम्मे म्हणजे १७०० रुग्ण घरीच उपचार घेत असल्याचा दाखला त्यांनी दिला. यामु़ळे महापालिका, खासगी रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या वाढली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण काही अंशी कमी झाला आहे. पुढील काळात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जाते. करोनाचा संसर्ग रोखण्यास सुरक्षित अंतर, मुखपट्टी, हातांची स्वच्छता ही त्रिसूत्री महत्त्वाची ठरते. करोनाची भीती कमी झाली असली तरी या त्रिसूत्रीचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक असल्याकडे वैद्यकीय तज्ज्ञ लक्ष वेधतात.

महापालिका, खासगी रुग्णालयात २८६३ खाटा रिक्त

घरगुती उपचारास प्राधान्य मिळाल्याने महापालिका आणि खासगी रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या वाढत आहे. सद्य:स्थितीत एकूण २८६३ खाटा रिक्त आहेत. महापालिका रुग्णालयात करोनावरील उपचारासाठी २२९५ खाटा असून त्यातील १६३८ खाटा रिक्त आहेत. तर खासगी रुग्णालयातील २०३९ पैकी १२२५ खाटा रिक्त असल्याचे डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.

अवास्तव देयकेही कारक

करोना काळात काही खासगी रुग्णालयांच्या अवास्तव देयक आकारणीचा अनुभव रुग्णांसह नातेवाईक घेत आहेत. शासकीय दरापेक्षा जादा शुल्क आकारणाऱ्या खासगी रुग्णांलयांना सुमारे दीड कोटीहून अधिकची रक्कम कमी करण्यास महापालिकेने भाग पाडले. चार रुग्णांकडून जादा घेतलेले तीन लाख ८० हजार रुपये परत न केल्यामुळे अशोका मेडिकव्हर रुग्णालयाविरुद्ध गुन्हादेखील दाखल करण्यात आला. घरगुती उपचाराकडे कल वाढण्यामागे अवास्तव देयक आकारणी हेदेखील एक कारण आहे.