02 April 2020

News Flash

देहविक्री व्यवसायातील महिलांची ‘वेगळी वाट’ 

प्रशिक्षण घेऊन स्वतचे ‘पार्लर’ सुरू करण्याचे स्वप्न

(संग्रहित छायाचित्र)

प्रशिक्षण घेऊन स्वतचे ‘पार्लर’ सुरू करण्याचे स्वप्न

नाशिक : गावकुसाबाहेरील ती वस्ती नेहमी टेहेळणीचा विषय राहिला आहे. त्यांच्या आरोग्य, पुनर्वसनाच्या गप्पा मारतांना त्यांना हवा असणारा आत्मसन्मानाचा मुद्दा तसा दुर्लक्षित राहतो. त्या वस्तीतील देहविक्रीच्या व्यवसायामुळे अनेकांच्या कपाळावर आठय़ा पडतात. हे चित्र बदलण्यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्ट, मनमिलन संस्था, जन शिक्षण संस्था आणि जिल्हा कौशल्य विकास विभाग यांनी पुढाकार घेतला आहे. वस्तीतील महिला आणि तृतीयपंथियांसाठी नुकतेच ‘सौंदर्यप्रसाधन विषयक’ प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून देहविक्री सोडत स्वतचे ‘पार्लर’ सुरू करण्याचे स्वप्न हे प्रशिक्षणार्थी पाहत आहेत.

जिल्हा परिसरात ५०० पेक्षा अधिक महिला देहविक्री व्यवसाय करतात. याशिवाय काही तृतीयपंथीही या व्यवसायात आहेत. या व्यवसायामुळे सामाजिक सुरक्षितता धोक्यात येते. गैरव्यवसाय या धंद्याखाली सुरू राहतात, असा आरोप नेहमीच होतो. देहविक्रीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी महिला प्रयत्न करत असून त्यांच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्ट, जन शिक्षण संस्था आणि कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या माध्यमातून संबंधितांसाठी सौंदर्यविषयक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे. या वर्गात २० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये देहविक्री करणाऱ्या महिला, तृतीयपंथीयांचा समावेश आहे. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या कार्यालयात संबंधिताना दिवसाकाठी दोन तास प्रशिक्षण देण्यात येत आहे. महिला आणि तृतीयपंथियांचा या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. वेगवेगळ्या शंका, अडचणी याचे समाधान करण्यात येत आहे. यातील काहींना लेखन-वाचनात अडचणी आहेत. फलकावर लिहून दिलेले जसेच्या तसे उतरवित असतांना या प्रशिक्षणार्थीचे वाचन आणि लेखन कौशल्य वाढीस लागत आहे. यातील अनेकांना स्वतचे ‘पार्लर’ सुरू करण्याची इच्छा, तर काहींना सौंदर्य प्रसाधनविषयक व्यवसाय सुरू करायचा आहे. याविषयी एका महिलेने या प्रशिक्षणातून आम्हांला प्राथमिक ज्ञान मिळत असल्याचे सांगितले. दिवसातील काही तास आम्ही आमचा व्यवसाय बाजूला ठेवत ही नवी वाट चाचपडत आहोत. या प्रशिक्षणामुळे कोणी बोलावल्यास घरी जावून त्यांच्यासाठी काम करू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.

देहविक्रीतून बाहेर पडणाऱ्या महिलांना प्रशिक्षणाचा मार्ग उपलब्ध हवा. या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधण्यात येत आहेत. महिलांचा या उपक्रमाला प्रतिसाद लाभत आहे. त्यांना आत्मसन्मान मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे व्यावसायिक प्रशिक्षण असल्याने या महिलांना कर्ज प्रकरण किंवा अन्य कामासाठी उपयोग होईल. जनशिक्षणामुळे या महिलांपर्यंत नवे पर्याय खुले झाले आहेत. लवकरच शिवणकामाचा वर्ग सुरू होणार आहे.

– आसावरी देशपांडे, नाशिक विभाग प्रमुख, प्रवरा मेडिकल ट्रस्ट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 4:40 am

Web Title: cosmetics and beauty parlour training to women in prostitution zws 70
Next Stories
1 बाजार समिती सभापतिपदावरून शिवाजी चुंभळे पायउतार
2 ‘द्वारका’तील कोंडी सुटेना
3 कुपोषणावर मात करण्यासाठी नागरिकांचेही प्रयत्न आवश्यक
Just Now!
X