लासलगांव येथे गुरुवारी रात्री एक लाख रुपयांच्या चोरीचा सांगितला गेलेला प्रकार बनाव असल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदाराने स्वार्थासाठी हा बनाव रचल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणी तक्रारदाराला अटक करण्यात आली आहे.

चाळीसगांव तालुक्यातील वाघुड येथे राहणारा समाधान सीताराम पाटील (३६) एका नातेवाईकाकडे वाहनचालक म्हणून कामास होता. व्यवहारातील पैसे आपल्याकडे रहावे यासाठी समाधानाने जबरी चोरीचा बनाव रचला. नातेवाईकाने शेतातील केळी आयशर टेम्पोत भरून त्याला कल्याण येथे विक्रीसाठी पाठविले. कल्याण बाजार समितीत व्यापाऱ्याला ही केळी विकून त्याच्याकडून एक लाख रुपये घेऊन समाधान चाळीसगावकडे परतत होता. त्याने नियोजित मार्ग बदलून चांदवडमार्गे चाळीसगावला जाण्याचा पर्याय निवडला. रात्री साडे आठच्या सुमारास लासलगावच्या हिवरखेड शिवारात एका रस्त्याच्या वळणावर ओम्नी वाहनाने आपला टेम्पो रोखला, वाहनचालक गाडीतच बसून राहिला अन्य तिघांनी चाकूचा धाक दाखवून आपल्याजवळील एक लाखाची रक्कम लंपास करत पलायन केले, अशी तक्रार घेऊन तो चांदवड पोलीस ठाण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच मनमाड उपविभागीय अधिकारी राहुल खाडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तक्रारदाराने दिलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहचले असता त्याने दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष स्थिती यात तफावत जाणवली. पोलिसांनी त्याची उलटचौकशी सुरू केली असता त्याने बनाव रचला असल्याची कबुली दिली.

आयशर टेम्पोवरील ताडपत्रीच्या आवरणात त्याने हे पैसे लपवल्याचे उघड झाले. मुलांच्या शिक्षणासाठी तसेच चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे, यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले. मात्र शाळा सुरू होऊन दोन महिने उलटल्यानंतर कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा होता अशी विचारणा पोलिसांनी केली असता तो निरुत्तर झाला. त्याच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा चांदवड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.