शहरात लग्न सोहळा, जॉगिंग ट्रॅक, रस्त्यांवरून मार्गस्थ होणाऱ्या महिलांच्या अंगावरील दागिने खेचणाऱ्या तीन जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम अर्थात मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सोनसाखळी चोरटय़ांवर वचक बसून भविष्यात अशा गुन्ह्य़ांचा प्रतिबंध होईल, असा यंत्रणेला विश्वास आहे. दुसरीकडे पोलिसांनी सोनसाखळी चोरांपासून महिलांना सावध करण्यासाठी फलक लावण्याकरिता पुढाकार घेतला आहे.

काही वर्षांपासून शहरात महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. एप्रिल २०१९ मध्ये लक्ष्मीनारायण लॉन्ससमोर मोटारसायकलवर आलेल्या चोरटय़ांनी तक्रारदार महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत, राणीहार ओढून पलायन केले होते. तक्रारदार पुतण्याच्या लग्नासाठी पुण्याहून आल्या होत्या. लग्न सोहळा आटोपून घरी जात असताना ही घटना घडली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा यांची वेगवेगळी पथके तयार करून शोध मोहीम राबविली गेली.

या संदर्भात मिळालेल्या माहितीआधारे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने सोमनाथ बर्वे (३०, मातोरी, मुंगसरा रोड) आणि नितीन पारधी (२५, फुलेनगर) यांना पाठलाग करून पकडले. या संशयितांकडे चौकशी केली असता त्यांनी नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण हद्दीतील त्यांचा साथीदार अनिल पवार (२३, सय्यद पिंप्री) यांच्यासोबत नऊ ठिकाणी सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले. संशयितांविरुद्ध यापूर्वी अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या संशयितांकडून साडेसात लाख रुपयांच्या सोन्याच्या नऊ लगड जप्त करण्यात आल्या आहेत. संशयितांनी गंगापूर, आडगाव, सरकारवाडा, इंदिरानगर, दिंडोरी, ओझरसह इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.

संशयित नियोजनबद्ध कट रचून संघटित टोळी तयार करून आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करीत असल्याचे तपासात पुढे आले आहे. गुन्ह्य़ाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांनी संशयितांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या गुन्ह्य़ाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) समीर शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

फलकांद्वारे जनजागृती

मागील दोन-तीन महिन्यात शहरात वेगवेगळ्या भागात सोनसाखळी चोरीचे प्रकार घडत आहे. चोरटय़ांवर कठोर कारवाई करताना पोलीस यंत्रणा महिला जनजागृतीसाठी शहरात फलक उभारत आहे. उपनगर पोलिसांनी ठिकठिकाणी २०० फलक लावले. मुख्य चौक, रस्त्यावर तसेच रिक्षाच्या मागील बाजूला हे फलक लावले गेले आहेत. या माध्यमातून महिलांना सोनसाखळी चोरटय़ांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतरही पोलीस ठाण्याच्या हद्दीतही जनजागृतीपर फलक लावले जात आहे.