निर्धार परिवर्तन यात्रेत जयंत पाटील यांची टीका

साम, दाम, दंड या पद्धतीने मुख्यमंत्री राज्य चालवीत आहेत. साम, दाम, दंडाचा हा मंत्र त्यांनी भाजपच्या नेत्यांनाही दिला असल्याचे टिकास्त्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोडले. भाजप नेत्यांनी शिवसेनेला पटकण्याची भाषा केली. तरीदेखील सेना अद्याप भाजपची साथ सोडण्यास तयार नसल्याची खिल्ली त्यांनी उडवली.

शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न आदी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने आयोजिलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेचे बुधवारी जिल्ह्य़ात आगमन झाले. यात्रेच्या या टप्प्यात प्रदेशाध्यक्षासह विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, आमदार हेमंत टकले असे काही निवडक नेते उपस्थित होते. इतर ज्येष्ठ नेते गळाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी सिन्नर, इगतपुरी आणि सायंकाळी पवननगर येथे सभा झाल्या.

सिन्नर येथील सभेत जयंत पाटील यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यावर दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याचा आरोप केला. पंतप्रधानांनी ६०० कोटींचे विमान अनिल अंबानीच्या फायद्यासाठी १६५० कोटींना घेतले. कमी क्षमतेचे विमान खरेदी करण्यामागे काहीतरी गौडबंगाल आहे. राज्यात स्वस्तात वीज निर्मिती करणारे प्रकल्प बंद करून भाजप सरकार इतर राज्यांकडून ती खरेदी करीत आहे. त्याचे कारण काय, असा प्रश्न करत त्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक वाढीसाठी ‘मेक इन महाराष्ट्र’, ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ योजना राबवूनही अद्याप गुंतवणूक आली नसल्याकडे लक्ष वेधले.

सिन्नरसारख्या औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने बंद पडले. अनेक जाचक अटी आणि निश्चलनीकरणामुळे हे संकट ओढावल्याचे त्यांनी नमूद केले.

धनंजय मुंडे यांनी सरकारच्या ‘अच्छे दिन’ घोषणेची चौकाचौकांत चेष्टा केली जात असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी देशातील १२५ कोटी लोकांची फसवणूक केली आहे. ५० रुपयांचे पेट्रोल, ६० रुपयांची डाळ आणि ४७५ रुपयांचा गॅस आज कुठे गेला?, असा  सवालही मुंडे यांनी केला.

भाजपकडून जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम

मोदी सरकारने जनतेची फसवणूक करण्यासाठी सवर्णाना १० टक्के आरक्षण दिले. तसेच ओबीसी आरक्षण कमी करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल होत असताना सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नाही. भाजप सरकारकडून मराठा-ओबीसी आणि दलित-सवर्णामध्ये भांडणे लावण्याचे काम केले जात असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली. निवडणुकीच्या तोंडावर ओबीसींसाठी ७५० कोटीच्या योजना आणल्या जात आहेत. मतांचा गठ्ठा मिळवण्यासाठी सरकारला कळवळा सुटला आहे. अगोदर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती द्या आणि मग नवीन योजना आणा, असे त्यांनी ठणकावले. नार-पारचे पाणी गुजरातला देण्याचा घाट घातला जात आहे. कांद्याला खर्च ८०० रुपये आणि अनुदान २०० रुपये ही भाजपने शेतकऱ्यांची चेष्टा केली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.