डिजिधन मेळाव्यात मंत्री येताच गर्दी ओसरली

रोकडरहित व्यवहारांसाठी धडपड करणाऱ्या जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी आयोजिलेल्या डिजिधन मेळाव्यात प्रारंभी सांस्कृतिक कार्यक्रमावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गर्दीने भरलेले सभागृह मंत्री महोदयांचे आगमन झाल्यानंतर मात्र रिते झाल्याचे पहावयास मिळाले. प्रबोधनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आखून गर्दीचे उद्दीष्ट साध्य केले परंतु प्रबोधनाचा हेतू साध्य न झाल्याने  या एकंदर स्थितीबद्दल संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी खेद व्यक्त केला.

निश्चलनीकरणानंतर केंद्र सरकारने रोकडरहित व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे. सर्वसामान्यांमध्ये रोकडरहित व्यवहाराची सवय लागावी, या व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी ठक्कर डोम येथे डिजिधन मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याचे उद्घाटन ज्या मंत्री महोदयांच्या उपस्थितीत होणार होते, त्यांच्या आगमनाची वेळ बदलली. परिणामी, प्रशासनाला ऐनवेळी महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते उद्घाटन करावे लागले.

प्रबोधनाचा कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून हा कार्यक्रम सुरू होता.  तो पाहण्यासाठी व प्रबोधन ऐकण्यासाठी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. सकाळपासून आलेल्या विद्यार्थ्यांनी कलावंतांकडून सादर झालेल्या गाण्यांचा दिलखुलासपणे आस्वाद घेतला. काही गाण्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिटय़ा व टाळ्यांच्या कडकडाटात सभागृह दणाणले. त्यावेळी सभागृहात चांगलीच गर्दी होती.    दुपारनंतर हा उत्साह ओसरला. दुपारी साडेतीन वाजता संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, केंद्रीय गृहरआज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री गिरीश महाजन, आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. बाळासाहेब सानप आदींचे आगमन झाले. मात्र, यावेळी विद्यार्थी निघून जाण्यास सुरूवात झाली. काही वेळात निम्म्याहून अधिक सभागृह रिकामे झाले. सभागृहातील रितेपणावर मंत्री महोदय कमालीचे नाराज झाले. त्या स्थितीत मार्गदर्शन करणे त्यांना भाग पडले. भामरे यांनी व्यासपीठावरून त्या मुद्यावर बोट ठेवले. मेळाव्यात थांबलेले विद्यार्थी मंत्र्यांची भाषणे सुरू झाल्यानंतर जाण्यास सुरूवात झाली. रोकडरहित व्यवहारांवर मार्गदर्शन जाणून घेणे सर्वासाठी महत्वाचे आहे. काही विद्यार्थी कंटाळा आल्याने  मेळाव्यातून निघून गेले हे खेदजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. अहिर यांनी रोकडरहित व्यवहारांचे लाभ कथन केले. या व्यवहारांना चालना दिली गेल्यामुळे नक्षलवादी, दहशतवादी व अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांना चाप लावण्यात यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मेळाव्यात रोकड रहित व्यवहारांसाठी नागरिकांना डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड, आधार पेमेंट, युपीआय, एसएएसडी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्या अनुषंगाने विविध राष्ट्रीयकृत बँकांनी रोकडरहित व्यवहारांची माहिती देण्याकरीता स्टॉलही उभारले. मेळाव्यात सहभागी झालेल्या ग्राहक व व्यापाऱ्यांसाठी सोडत पध्दतीने ५० हजार ते एक लाखापर्यंतची पारितोषिके ठेवण्यात आली होती. या सोडतीचे निकाल जाहीर करण्यात आले.

सरकारी यंत्रणांचाच प्रतिसाद

मेळाव्यात विविध बँका, इ वॉलेट, टेलिकॉम, वाहतूक नेटवर्क कंपन्या, आधारशी संलग्न भरणा विक्रेते, व्यापारी संघटना, आपले सरकारचे सेवा केंद्रचालक, स्वस्त धान्य दुकानदार, छोटे विक्रेते आदींना निमंत्रित करण्यात आले होते. परंतु, राष्ट्रीयकृत व शासकीय यंत्रणांशी निगडीत मंडळी वगळता इतरांचा मेळाव्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही.