५०० व एक हजारच्या नोटा बाद झाल्यानंतर निर्माण झालेला चलनकल्लोळ अद्याप कायम आहे. जुन्या नोटा खिशात असुनही व्यवहारात त्या वापरणे बंद झाले आहे. त्यामुळे या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांसमोर रांगा आहेत. प्रवास, दैनंदिन खर्च व खरेदी व्यवहार सुटय़ा पैशांअभावी करणे अवघड झाल्याने सर्वसामान्य त्रस्तावल्याचे चित्र आहे. पंतप्रधानांच्या निर्णयाविषयी सर्वसामान्यांना काय वाटते, हे त्यांच्याच शब्दात..

केवळ रांगेत उभे राहण्याचा त्रास

काही नोटा दैनंदिन व्यवहारातून बाद झाल्या. त्यामुळे फार काही अडले असे नाही.  एटीएम बंद असल्याने तिथुन पैसे काढताच येणार नाही. सुरूवातीचे आठ दिवस हा त्रास होणार आहे. बँकेत जा, पैसे नाही मिळाले तर आल्या पावली परत या.. यामध्ये केवळ रांगेत उभे राहण्याचा त्रास आहे. आम्ही बचत गटाचा बँकेत भरणा केल्यावर पुढील तीन महिने पैसे भरता येतील, पण काढता येणार नाही असे सांगण्यात आले. याचीही सवय होईल असे वाटते. मुळात पंतप्रधानांनी चांगला निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भ्रष्टाचार नियंत्रणात येईल. बनावट नोटा निर्मितीला चाप बसेल. सरकारने नव्या नोटा बाजारात आणतांना सर्व शक्यता लक्षात घेत कोणत्याही प्रकारची नक्कल होणार नाही याची काळजी घेतली याचा आनंद आहे. त्यासाठी जो त्रास होईल तो सहन करण्याची तयारी आहे. – चैत्राली गडकरी (शिक्षिका)

 

पैशांची किंमत कळली..

पाचशे व हजारच्या नोटा बाद झाल्यामुळे आता खऱ्या अर्थाने पैशांची किंमत कळली आहे. १०० ची नोट खर्च करतांना १० वेळा विचार होत आहे. यामुळे पैशांची किंमत कळण्यास सुरूवात झाली. हा निर्णय कळल्यानंतर येथील एका सहकारी बँकेत पैसे काढण्यासाठी गेलो. बँकेने कामकाजाची वेळ संपल्यानंतरही थांबवत स्वतजवळ जेवढी शिल्लक आहे, त्या प्रमाणे प्रती ग्राहक एक हजार या

प्रमाणात पैश्यांचे वाटप केले.

याचा उलट अनुभव राष्ट्रीयकृत बँकेत आला. अधिकारी व कर्मचारी खातेदारांवर वैतागलेले आहेत. कामाचा भार वाढला की, अजून काही कारणे माहित नाही. सरकारच्या या निर्णयामुळे पुढील काळात त्याचा उपयोग होईल. राजकारण्यांसह उद्योजकांकडे असणारा अतिरीक्त पैसा या निमित्ताने बाहेर येईल. सरकारने याबाबत एक वेगळे खाते तयार करत त्या खात्यात हा अतिरीक्त पैसे जमा करण्याचे आवाहन करावे. जेणेकरून यात जमा होणारा पैसा हा आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शहिद जवानांच्या कुटुंबियांना मदत म्हणून देता येईल. – योगेश बक्षी (व्यावसायिक)

 

बदल चांगलाच आहे

पंतप्रधानांनी ज्यावेळी चलन बंदची घोषणा केली, त्याच्या अवघ्या काही मिनिटांत एटीएमवर जाऊन काही रोख रक्कम काढली. त्यामुळे सुरूवातीचे दोन दिवस त्रास झाला नाही. मात्र आता बँकेतील गर्दी पाहुन एटीएमवर दोन ते तीन चक्कर मारून झाल्या आहेत. या कालावधीत रांगेत उभे राहुनही ‘पैसे संपले’चा फलक दिसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागले. ज्या ठिकाणी कार्ड वापरणे शक्य होते, त्या ठिकाणी तसा वापर केला. पण भाजी, दूध या किरकोळ खरेदीला सुट्टे पैसे कुठून आणणार ?  त्यात एटीएमवर २००० रुपये काढण्याची मुभा मिळाल्याने तसा आकडा दिला आणि दोन हजाराची नवी नोट मिळाली. पण इतर खरेदीत समोरील व्यक्तीकडे सुट्टे पैसे नसल्याने या नोटेचे काय करायचे हा प्रश्न आहे. सरकारने घेतलेला निर्णय चांगला आहे. त्याचे परिणाम चांगले की वाईट माहीत नाही. पण सर्वसामान्य जनतेकडून त्यास विरोध नाही याचा अर्थ हा बदल चांगलाच आहे.  – जितेंद्र थोरात (नोकरदार)

 

गरज असेल तरच बँकेत गर्दी करावी

ऐनवेळी नोटा बाद झाल्याची घोषणा झाल्यामुळे धास्तावल्यासारखे झाले. पण हा निर्णय चांगला आहे. भ्रष्टाचार मुळापासून उपटायचा असेल तर सरकारच्या या निर्णयाचे स्वागतच करायला हवे. घोषणेनंतरही अद्याप आपण बँकेत किंवा एटीएमवर गेलेले नाही. कारण आठ-दहा दिवसांचा घर खर्च भागेल एवढी शिल्लक असल्याने उगाच बँक किंवा एटीएमच्या आवारात गर्दी का करावी? उलटपक्षी ज्यांना खरी गरज आहे, त्यांना या सवलतीचा फायदा घेऊ द्यावा.  – सायली आचार्य (गृहिणी)

 

निर्णय चांगला, पण नंतरचा घोळ मिटवा

५०० व एक हजाराच्या नोटा रद्दबातल ठरवताना आपल्याकडील जुन्या नोटा बँकेत तातडीने जमा करावेत असा त्या निर्णयाचा आशय होता. यामुळे पुढील दोन दिवसात ज्या जुन्या नोटा होत्या, त्या आपण बँकेत जमा केल्या. बँकेकडून दोन हजाराची नोट दिली गेली. परंतु, पेट्रोल पंपावर ती नाकारली जाते. पूर्ण रकमेचे इंधन भरावे असे सांगून अडवणूक होते. ही नोट किराणा व तत्सम खरेदीसाठी स्वीकारली जात नाही. कारण, तेवढय़ा रकमेचा किराणा वा तत्सम माल घ्यावा, असे बंधन घातले जात आहे. सुटय़ा पैशांचे कारण देऊन सर्रास हे प्रकार घडत असल्याने गोंधळाची स्थिती आहे. सरकारने प्रथम अशा घटकांवर कठोर कारवाईची गरज आहे. नागरिकांनी स्वत:जवळील जुन्या नोटा बँकेत भरण्याकडे कल ठेवला. दुसरीकडे शासन त्या नोटा पेट्रोल पंप, औषध दुकाने व प्रवासात चालतील याची मुदत वाढवत आहे. यामुळे ज्यांनी आधी नोटा बँकेत भरल्या, त्यांची अधिक अडचण झाली. कारण, त्यांच्याकडे दैनंदिन खर्च भागविण्यासाठी जुने चलनही नाही आणि नवीन नोट कोणी स्वीकारायला तयार नाही. – डॉ. वृन्दा भार्गवे (प्राध्यापिका)

 

सर्वसामान्यांना त्रास कशासाठी ?

पंतप्रधानांच्या या निर्णयाचा फायदा होईल यात शंका नाही. पण याचा त्रास सर्वसामान्यांना कशासाठी? पैसे काढण्यासाठी बँकेत जा किंवा एटीएमवर लांबच लांब रांगा आहेत. हातातील कामधंदे सोडून पैसे काढण्यासाठी रांगेत उभे रहावे लागते. त्यातही पैसे काढण्यावर मर्यादा आल्या. महिन्याचा खर्च भागवायचा कसा? खिशात जुन्या नोटय़ा आहेत. पण त्याचा काय उपयोग. शेवटी मुलांच्या गल्ल्यात जमविलेले पैसे आणि बायकोने बाजुला ठेवलेल्या पैसे यातून दैनंदिन खर्च भागविणे सुरू आहे. किमान त्यातून दूध, भाजीपाला व तत्सम खर्च भागत आहे.  – संदीप वाघ (कामगार)