हिरे कुटुंबियांच्या केबीएच दंत महाविद्यालयाला महापालिकेचा हिसका

महापालिका रुग्णालयात १० एमबीबीएस आणि दोन दंतरोग तज्ज्ञ उपलब्ध करण्याची अट मान्य न केल्याने महानगरपालिकेने महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित पंचवटीतील के. बी. एच. दंत महाविद्यालयाला जेडीसी बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय कार्यानुभवासाठी उपलब्ध करण्यास नकार दिला आहे. पालिका रुग्णालयांशी संलग्नता राखण्याचा संस्थेचा प्रस्ताव फेटाळल्याची बाब महापालिकेने अखिल भारतीय तंत्रशिक्षण विभागाला पत्राद्वारे कळविली आहे. रुग्णालय संलग्नता रद्दबातल केल्याने संस्थेच्या पदव्युत्तर दंत (एमडीएस) आणि पदवी दंत (बीडीएस) अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना पालिका रुग्णालयात कार्यानुभवाचे दरवाजे बंद झाले आहेत. जिल्ह्य़ाच्या राजकारणात प्रभाव राखणाऱ्या हिरे कुटुंबियांची ही संस्था असून त्यांच्या महाविद्यालयाला परवानगी नाकारत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला धडाका सुरूच ठेवला आहे.

महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावणाऱ्या मुंढे यांच्या त्रिसूत्रीमुळे सत्ताधारी ‘भाजप’ची अडचण झाली आहे. वाढीव मालमत्ता करावरून आयुक्तांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणत त्यांना हटविण्याची रणनीती अपयशी ठरली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे तो प्रस्ताव मागे घ्यावा लागला. दरम्यानच्या काळात पालिकेच्या मालमत्ता अल्प भाडय़ात ताब्यात ठेवणाऱ्या राजकीय मंडळींच्या संस्थांकडे पालिका प्रशासनाची नजर वळली. त्याचा फटका

‘भाजप’चे आमदार बाळासाहेब सानप यांच्या संस्थेला बसला. पालिकेने नऊ लाखांहून अधिकचे भाडे भरण्याबाबत त्यांना नोटीस बजावली. सातपूर येथे ‘मनसे’च्या कार्यालयासाठी घेतलेल्या गाळ्याचा व्यावसायिक कारणास्तव वापर होत असल्यावरून संबंधितांनाही नोटीस बजावली गेली. आता मातब्बर राजकीय घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरे कुटुंबियांच्या शैक्षणिक संस्थेला महापालिकेने दणका दिल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते.

पंचवटी येथील केबीएच दंत महाविद्यालयातील बीडीएस, एमडीएस अभ्यासक्रमासाठी पालिकेचे नाशिकरोड येथील जेडीसी बिटको आणि कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यानुभवाकरिता अनेक वर्षांपासून उपलब्ध करून दिले जाते. कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न रुग्णालय असणे आवश्यक ठरते. या अनुषंगाने केबीएच दंत महाविद्यालय आणि नाशिक महापालिका यांच्यात झालेला करार संपुष्टात आला. त्याची मुदत पुढील पाच वर्षांसाठी वाढवून मिळावी, अशी मागणी महाविद्यालयाने महापालिकेकडे केली होती. या अनुषंगाने महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्था व्यवस्थापक आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात चर्चा झाली. महापालिका रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे.  यामुळे पालिका रुग्णालयात कार्यानुभवाची सुविधा देण्याच्या बदल्यात केबीएच महाविद्यालयाने १० एमबीबीएस आणि दोन एमडीएस अर्थात दंतरोग तज्ज्ञ उपलब्ध करावेत, अशी मागणी आयुक्तांनी केली होती. त्यास महाविद्यालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. डॉक्टर उपलब्ध करून न दिल्याने केबीएच दंत महाविद्यालयास पालिकेचे रुग्णालय उपलब्ध करून देता येणार नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संस्थेला पत्राद्वारे कळविले आहे. इतकेच नव्हे तर, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला केबीएच दंत महाविद्यालयाचा प्रस्ताव महापालिकेने रद्द केल्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे.

केबीएच दंत महाविद्यालय आणि महापालिका यांच्यात झालेल्या कागदपत्रांवरून या घडामोडी उघड झाल्या आहेत. केबीएच दंत महाविद्यालय मागील १० ते १५ वर्षांपासून शैक्षणिक कार्यानुभवासाठी महापालिकेच्या रुग्णालयांचा वापर करीत आहे. महापालिकेच्या मागण्यांबाबत संस्था चालकांशी चर्चा केली जात असून त्यातील शक्य असतील त्या मागण्यांची पूर्तता करून हा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल. महापालिका प्रशासनाचे आजवर सर्वतोपरी सहकार्य मिळाले आहे. पुढेही ते कायम राहील.

-डॉ. संजय भावसार  (प्राचार्य, केबीएच दंत महाविद्यालय)