18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

सरकारशी लागेबांधे असलेल्यांनी आधीच नोटा बदलल्या!

राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी देखील सरसकट फसवी असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले.

खास प्रतिनिधी, नाशिक | Updated: October 3, 2017 3:43 AM

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार

शरद पवार यांची टीका; कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप

पंतप्रधानांनी वर्षभरापूर्वी देशाला संबोधित करताना जाहीर केलेल्या नोटाबंदीचा झटका सर्वाना बसला. पण सुरूवातीला कोणी ते मान्य केले नाही. भाजप सरकारशी लागेबांधे असणाऱ्या काळे पैसेवाल्यांनी आधीच नोटा बदलून घेतल्या. सर्वसामान्य नागरिक कित्येक दिवस रांगेत उभे राहिले. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची तोफ माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी डागली. प्रारंभी या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या पवार यांची भूमिका आता पूर्णपणे बदलल्याचे अधोरेखीत झाले आहे. इंधन दरवाढीद्वारे भाजप सरकार नागरिकांची लूट करीत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी देखील सरसकट फसवी असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले.

महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री जयंती निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी पक्षातील विविध शेतकरी संघटनांना सोबत घेत सोमवारी येथील गंगापूर रस्त्यावरील नंदनवन लॉन्स येथे पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय शेतकरी प्रतिनिधी अधिवेशन पार पडले.   कृषिमालाचे घसरलेले भाव, नोटाबंदी, इंधन दरवाढ आदींवरून त्यांनी भाजपवर हल्ला चढविला.  फडणवीस सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचं जेवण आहे. शेती-शेतीपूरक सर्वच प्रकारचे कर्ज माफ झाले पाहिजे. राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांची सामूहिक ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. जागतिक बाजारात इंधनाचे दर कमी होऊनही त्याचा लाभ नागरिकांना दिला नाही. कराच्या माध्यमातून सरकारने नागरिकांची लूट सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला.

देशात व राज्यातील परिस्थितीची किंमत सर्वाना मोजावी लागत आहे. त्यात शेतकरी व शेतमजुरांना ती अधिक मोजावी लागत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत भाजप सरकार गंभीर नसून शेतमालाच्या किंमती पाडण्याचा खेळ केला जात आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला तर देश उद्ध्वस्त होईल. शेतमालाच्या किंमतीबरोबर खेळणे देशाला परवडणारे नाही.

– शरद पवार

First Published on October 3, 2017 3:43 am

Web Title: demonetization sharad pawar central government farmers debt relief