विजयादशमीनिमित्त नाशिकच्या बाजारपेठेला वेगळीच झळाळी प्राप्त झाली असून ‘रिअल इस्टेट’पासून ते सुवर्ण पेढय़ांपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स व घरगुती वस्तू, वाहन अशा विविध व्यावसायिकांनी सवलतींचा लाल गालिचा अंथरल्याचे पहावयास मिळत आहे. सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसात बरेच चढ-उतार झाले असले तरी या मुहूर्तावर भाव काहीसे खाली आल्याने जळगाव व नाशिक या प्रमुख शहरांसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील सराफी बाजारपेठांना ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. विजयादशमीला सोने घेण्यासाठी दुकानदारांकडे आगाऊ नोंदणी करून ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे वाहन बाजार ही तेजीत असून इच्छुकांना गाडय़ा घेण्यासाठी दिवाळीपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला नागरिकांची पूजा साहित्य खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. प्रमुख बाजारपेठांमध्ये पिवळ्या व केशरी रंगातील झेंडुची पखरण झाली. सकाळपासून प्रचंड मागणी असल्याने १५०-२०० रुपये प्रती किलो असे त्याचे असणारे भाव सायंकाळी मात्र उतरण्यास सुरूवात झाली. झेंडु बरोबरच शेवंतीची पांढरी तसेच केशरी फुले २०० च्या घरात तर अस्टर फुलाने ३०० रुपये प्रती किलोचा उच्चांक गाठला.
वाहन दुकानांमध्ये ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात आगावू नोंदणी केली. व्यावसायिकांनी वेगवेगळ्या योजना उपलब्ध करून देत ग्राहकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यात कर्ज सुविधा, दसऱ्यानिमित्त खास सवलत, गिफ्ट व्हाऊचर्स, सोडत आदींचा समावेश आहे.
यंदा दसरा-दिवाळीवर दुष्काळाचे सावट असल्याने ग्रामीण भागातून ट्रॅक्टरसह अन्य चार चाकी वाहनांना अपेक्षित प्रतिसाद नसतांना शहरात मात्र वाहन बाजारात जुन्या-नव्या वाहनांची खरेदी-विक्री तेजीत आहे. त्यातही चारचाकी वाहन खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असल्याने काही विशिष्ट कंपन्यांच्या नवीन गाडय़ा खरेदी करण्यासाठी ग्राहकांना काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. घरकूल खरेदीसाठी बांधकाम व्यावसायिकांनी चौरस फुटाच्या दरात सवलत, गृहोपयोगी साहित्याची मोफत उपलब्धता आदी योजना मांडल्या आहेत. शहरी भागात असे चित्र असले तरी ग्रामीण भागात मात्र दुष्काळाचे सावट अधोरेखीत होत आहे.
विजयादशमीला सुवर्ण खरेदीला विशेष महत्व आहे. बाजारपेठेतील उत्साहात सर्व व्यावसायिक एका बाजूला आणि सराफी व्यावसायिक दुसऱ्या बाजूला असे चित्र असते. दोन ते तीन वर्षांपासून सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार झाले असताना दसऱ्याच्या दिवशी तो कसा राहणार, याविषयी ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. मागील काही महिन्यांचा आढावा घेतल्यास यंदा ग्राहकांना नेहमीच्या तुलनेत काहिशा कमी भावात सोने-चांदी खरेदीचा मुहूर्त साधता येणार आहे. देशातील सुवर्णनगरी म्हणून परिचित असणाऱ्या जळगावसह नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सराफ बाजारात या मुहूर्तावर खरेदीचा उत्साह पहावयास मिळतो. गेल्या काही महिन्यात सोन्याचे भाव २६ ते ३० हजार या दरम्यान राहिले. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला २४ कॅरेट सोन्यासाठी प्रती तोळा २७३५० रुपये २२ कॅरेटला २७०५० रुपये असा दर आहे. सराफी पेढय़ांनी ग्राहकांसाठी दुचाकी-चार चाकी वाहन, स्मार्ट फोन यासह घटनावळीवर सवलत असे पर्याय दिले आहेत. या शिवाय वनग्रॅम सोन्याचे दागिन्यांनाही ग्राहकांची पसंती लाभते. दिवाळीपर्यंत हा उत्साह कायम राहील, अशी अपेक्षा दंडे ज्वेलर्सकडून व्यक्त करण्यात आली.

panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
Ambala Divisional Commissioner Renu Phulia
महिला आयएएस अधिकाऱ्याने २० वर्षांपूर्वीची स्थगिती उठवली, नवरा आणि मुलाने लगेचच खरेदी केला भूखंड
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला