मालेगाव पॉवर सप्लाय कं पनीचा निर्णय; थकबाकीची रक्कम ९२ कोटींच्या वर

मालेगाव : थकबाकी वसुलीसाठी वारंवार प्रयत्न करूनही वीज ग्राहकांकडील थकबाकी सातत्याने वाढत असल्याने शहरातील वीज वितरणाचा खासगी ठेका घेतलेल्या मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीने आता वसुलीसाठी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा पवित्रा घेतला आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून शहरात वीज वितरणाचे खासगीकरण सुरू झाले आहे. करोना संकटामुळे ठेका घेतलेल्या मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीची ग्राहकांकडील थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यानंतर करोना नियंत्रणात आल्यावरही या परिस्थितीत सुधारणा होऊ  शकलेली नाही. वसुलीसाठी कंपनीने वेगवेगळे प्रयत्न करूनही थकबाकीचा आकडा वाढतच आहे. ऑक्टोबर महिन्यात एकूण एक लाख आठ हजार ग्राहकांपैकी जेमतेम चाळीस हजार ग्राहकांनी अवघे १६ कोटी रुपये देयके अदा केली. त्यामुळे घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक वापर प्रकारातील ग्राहकांकडे एकूण ९२ कोटींवर थकबाकीची रक्कम गेली आहे.

या वसुलीसाठी कंपनीतर्फे ग्राहकांना भ्रमणध्वनीद्वारे तसेच घरोघरी जाऊन विनवण्या करण्यात आल्या, मात्र तरीही प्रतिसाद न मिळाल्याने आता कोणतीही पूर्वसूचना न देता थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कृती सुरू करण्यात आल्याचे कंपनीने कळविले आहे. वीज वितरण करणारी खासगी कंपनी महावितरण कंपनीकडून वीज खरेदी करीत असते.

ही रक्कम वेळेवर न भरल्यास महावितरण कंपनीकडून १८ टक्के व्याज आकारणी केली जाते. त्याशिवाय दुरुस्ती तसेच दैनंदिन खर्चाचा भारही कंपनीस उचलावा लागत असतो. या सर्व खर्चाच्या तुलनेत ग्राहकांना प्रत्यक्षात करण्यात येणाऱ्या एकूण वीज आकारणीचे प्रमाण वीजचोरी, गळती यांसारख्या कारणांमुळे आधीच व्यस्त आहे. त्यामुळे तोटा सहन करावा लागत असतानाच नीट वसुलीही होत नसल्याने अडचणी आणखी वाढत आल्याचे कंपनीने म्हटले आहे.

आर्थिक अडचणींमुळे महावितरण कंपनीकडून खरेदी केलेल्या विजेचे पैसे भरणे मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीला अडचणीचे ठरत आहे. त्यातून दरमहा आवश्यक तेवढी वीज खरेदी करता आली नाही तर आगामी काळात शहरवासीयांना भारनियमनाचा सामना करावा लागू शकतो. हे टाळण्यासाठी ग्राहकांनी थकबाकीची रक्कम तातडीने भरावी, असे आवाहनही कंपनीतर्फे करण्यात आले आहे.